Baramati News l 'सोमेश्वर'च्या अवाजवी आडसाली ऊस लागवडीवर येणार मर्यादा...८६०३२ बरोबर फुले ०२६५ ला देखील प्राधान्य : चर्चासत्रात महत्वपूर्ण निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
'सोमेश्वर'चा लागवड हंगाम १ जुलैपासून सुरू करावा, रोपपध्दतीची लागवड नोंद केल्यापासून तीस दिवसांत करावी, अवाजवी आडसाली ऊस लागवडीवर मर्यादा आणावी असे निर्णय आज सोमेश्वरच्या सभासदांनी चर्चासत्रात घेतले. तसेच, को ८६०३२ ची तोडणी संपल्यावरच फुले २६५ ची तोड सुरू करायची हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याऐवजी ज्या तारखेचा ८६०३२ तोडला जाईल त्या तारखेचा फुले २६५ तोडून पुढे जायचे, असाही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर इतिहासात पहिल्यांदाच ऊस लागवड व गाळप हंगाम नियोजन अधिक पारदर्शक होण्यासाठी 'सभासद चर्चासत्राचे' आयोजन करण्यात आले होते. केले होते. अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, जितेंद्र निगडे, शांताराम कापरे, अनंत तांबे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, कमल पवार उपस्थित होते.
शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे यांनी, तोडणी-वाहतूक यंत्रणेचा शेतकऱ्यांना त्रास होतो याबाबत उपाय करावा व फुले २६५ वाणाबाबत अन्याय्य धोरण राबवू नये अशी भूमिका मांडली. किशोर भोसले, दीपक निगडे, लालासाहेब दरेकर, उमेश मांडके यांनीही, को ८६०३२ वाणासोबत फुले २६५ ला न्याय द्यावा आणि सुरू व पूर्वहंगामी लागवडींना अनुदान द्यावे अशी मागणी केली. योगेश भोसले यांनी, आडसाली लागवडीचा शुभारंभ १ जुलैला करण्याची तर सुरेश जेधे यांनी १५ जुलैला करण्याची सूचना केली. दत्तात्रेय ढोले यांनी, मोठ्या शेतकऱ्याला आडसाली लागवडीचे प्रमाण ठरवून द्यावे अशी मागणी केली. तर संजय घाडगे, शिवाजी शेंडकर, बाळासाहेब राऊत, ऋतुराज काकडे यांनी, गेटकेनच्या गाळपास प्राधान्य देऊ नये अशी मागणी केली. धनंजय हाके यांनी, दरवर्षी कारखान्याजवळील शेतकऱ्यांच्या गाळपात अन्याय होतो हा मुद्दा निदर्शनास आणला. विजय काकडे यांनी, सुरू व पूर्वहंगामी लागवडीचे योग्य नियोजन करा अशी मागणी केली. दत्तात्रेय भोईटे, सोमनाथ मदने, महेश जेधे, भास्कर कदम, हंबीरराव जगताप यांनी, तोडणी यंत्रणा मनमानी करत असल्याचे अनुभव सांगितला. बुवासाहेब हुंबरे व शशिकांत शहा यांनी, ऊसनोंद व तोडणी कार्यक्रम संपूर्ण डिजिटल करण्याची मागणी केली.
कार्यकारी संचलाक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.
-----------------------
आडसाली उसलागवडीवर मर्यादा आणण्यापेक्षा पर्यायी पूर्वहंगामी, सुरू लागवडी परवडतात हे शेतकऱ्यांना पटलं पाहिजे. खोडवा शेतकरी आणि कारखान्यालाही फायद्याचा असल्याने वाढला पाहिजे मात्र तोडणी वेळेत हवी. फेब्रुवारीनंतर तुटणाऱ्या उसाला लागवडीवेळीच अनुदान जाहीर करावे. आडसाली लागवड हंगाम शास्त्रीयदृष्ट्या १ जुलै रोजी सुरू करणे इष्ट आहे. रोपलागवडीची नोंद घेतल्यानंतर पुढील तीस दिवसांच्या आत लागवड करणे बंधनकारक करावे. ऊसनोंद डिजिटली करून लागवडीचा फोटो अपलोड करावा, ऊसतोडणीचा मेसेज आठ दिवस आधी मिळावा असे, अभ्यासपूर्ण विवेचन माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी करत संचालक मंडळाचा भार कमी केला. तसेच सरत्या हंगामात अंदाज आणि नियोजन चुकले हे संचालक मंडळाने स्वीकारावे आणि आगामी काळात ते होऊ देऊ नका, असे कानही त्यांनी टोचले.
-----------------------
पुरूषोत्तम जगताप म्हणाले, संचालक मंडळाचा सरत्या हंगामात अंदाज चुकला हे मान्य करतो मात्र घरावर नांगर फिरविला असे काहींनी बोलणे चुकीचे आहे. संपूर्ण राज्याचेच अंदाज चुकले आहेत. एकरी उत्पन्नात वाढ, टंचाईग्रस्त जिराईत भागातील साडेपाच लाख टन ऊस प्राधान्याने आणणे, आडसालीसोबत अन्य लागवडींना न्याय देणे ही कसरत केल्याने काही ऊस वीस महिन्यांनी तोडले गेले. कारखाना १६० दिवस चालला तरच परवडणार असल्याने जवळच्या कार्यक्षेत्रातील गेटकेन आणला. सभासदांना दिलेले प्रोत्साहन अनुदान, आगामी काळात दिले जाणारे खोडकी बिल गेटकेनधारकांना दिले जाणार नाही. दरम्यान, आगामी हंगामात केवळ ३१ हजार एकरांच्या नोंदी असल्याने गटकेन आणावा लागेल. ज्या शेतकऱ्यांचा यावर्षी आणला आहे तेच पु्न्हा उत्सुक आहेत मात्र सभासदांनी संमती दिली तरच गेटकेन आणणार. आडसाली ४० टक्के आडसाली, ३५ टक्के खोडवा तर पूर्वहंगामी व सुरू ऊस २५ टक्के असे प्रमाण हवे. मात्र पुन्हा आडसालीबाबत पालन केले नाही तर मागचे दिवस पुढे येतील.
---
To Top