Bhor News l संतोष म्हस्के l भोरला अल्पवयीन सुसाट वाहनचालकांना कोण आवरणार : 'सिंघम'चा धाक उरलाच नाही

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरासह तालुक्यात अल्पवयीन सुसाट वाहनचालकांची संख्या वाढली असल्याने दैनंदिन अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.दरम्यान  पोलिसांचा धाक वाहनचलकांना उरलाच नसल्याने अल्पवयीन वाहनचालक सुसाट ट्रीपल,चौबल वाहने रस्त्यावर चालवताना दिसत आहेत.यामुळे अल्पवयीन वाहन चालकांना आवर कोण घालणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
         माझ्या बाबुला गाडी येते, बाळ छान गाडी चालवतो, शहरात चाललाय बाळा गाडी घेऊन जा असे म्हणत पालक वर्ग आपापल्या अल्पवयीन मुलां- मुलींना दुचाकी तसेच चारचाकी वाहन वारंवार चालवण्यास देत असतात.परिणामी अल्पवयीन मुले वाहनाची वेग मर्यादा न ठेवता तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवितात.याचा दुष्परिणाम होऊन छोटे-मोठे अपघात घडतात. यात अनेकदा बऱ्याच जणांना आपला जीव गममावा लागतो तर काहींच्या शरीराची मोडतोड होऊन परिस्थिती नसतानाही लाखो रुपये हॉस्पिटलच्या खर्चासाठी घालवावे लागतात. अनेकदा तर शहरातील बाजारपेठेत अल्पवयीन वाहन चालकाच्या गलथानपणामुळे पादचारी नागरिक व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थिनींना वाहनाच्या कर्कश हॉर्नच्या आवाजामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.अल्पवयीन वाहनचालक तसेच ट्रिपल व चौबल वाहन चालवणारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------
अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करणार
      अल्पवयीन मुला-मुलींनी दुचाकी,चारचाकी वाहने चालवू नयेत.पालकांनी काळजी घेऊन अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देऊ नयेत.भोर शहरासह तालुक्याच्या इतर भागात अल्पवयीन वाहनचालक ट्रिपल व चौबल वाहने चालविताना आढळून आल्यास तसेच वाहने रस्त्यावर सुसाट पळविताना दिसल्यास तात्काळ कारवाई करणार असल्याचे भोर पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांनी सांगितले.
                                          
To Top