सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील होळ, मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, करंजेपुल, निंबुत, करंजे, वाकी-चोपडज, चौधरवाडी, मगरवाडी परिसराला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.
रात्री नऊ वाजता सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडाले, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने निरा-बारामती रस्ता, वाणेवाडी-मुरूम रस्ता, मळशी-वाघळवाडी, मळशी-निंबुत रस्ता काही काळ बंद राहिले. तसेच टोमॅटो, काकडी, दोडका, कोथिम्बिर, कोबी-फ्लावर सारखी पिकांचे नुकसान झाले आहे. तर उसासारखी भक्कम पिकांना देखील या वादळाचा फटका बसला आहे. झाडे पडल्याने काल रात्री पासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या परिसरात असलेल्या पाच ते सहा ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या उडाल्याने ऊसतोडणी कामगारांचे संसार उघड्यावर आले. वाणेवाडी-मळशी येथे धन्यकुमार जगताप यांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले.
ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेली झाले ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाकी ता. बारामती येथील राजेंद्र खैरे यांच्या मालकीचे औदुंबर डेअरी फार्मचे २५ बाय २७० पत्र्याचे शेड उडून गेल्याने नुकसान झाले आहे. तर करंजेपुल-गायकवाड वस्ती सोमनाथ निवृत्ती गायकवाड यांच्या घरावर झाड पाडून घरासह आतील साहित्याचे नुकसान झाले आहे.