Bhor News l भोरच्या दक्षिण पट्ट्यात वन्यप्राण्यांची अन्नपाण्यासाठी वनवन : आंबाडेत पाण्याच्या शोधात कोल्हा विरहित कोसळला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कडक उन्हाळा पडल्याने जंगल परिसरातील जलस्त्रोत पूर्णतः आटले आहेत.परिणामी तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वन्यप्राण्यांची अन्नपाण्यासाठी वनवन सुरू असून पाण्यासाठी जंगलातून मानव वस्तीकडे भटकणारा कोल्हा १५० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना आंबाडे तास.भोर येथील शिवारात घडली.ग्रामस्थ, तरुणांनी सावधानता बाळगीत तात्काळ वनविभाग कर्मचाऱ्यांच्या साह्याने पाण्यात पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढून जीवदान दिले.
          तालुक्याच्या दक्षिणेकडील नेरे, आंबाडे परिसरातील डोंगररांगांमधील जंगलांमध्ये अनेक प्रकारचे वन्यप्राणी आहेत.दरवर्षी जंगल परिसरात ठीकठिकाणी पाण्याचे जलस्त्रोत असल्याने वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवस्तीकडे धाव घेत नाहीत. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच जंगलातील पानवठे आटले असल्याने वन्यप्राणी तसेच पशुपक्षांना
पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. परिणामी अन्य पाण्याच्या शोधात मानववस्तीकडे आलेल्या काही वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.काही वन्यप्राणी खोल विहिरीत पडले तर काहींना पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवित आहेत.वीसगाव खोऱ्यात एक महिन्यात कोल्हा विहिरीत पडण्याची दुसरी घटना असून स्थानिक ग्रामस्थ, तरुण तसेच वनविभागाचे कर्मचारी तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांना जीवदान देण्याचे काम करीत असतात.शुक्रवार दि.१० रात्रीच्यावेळी आंबाडे येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला किरण रांजणे, मिथुन रांजणे ,गजानन खोपडे ,विजूकाका खोपडे ,काका काकडे, सनी खोपडे व वनविभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ बाहेर काढले. कोल्हा विहिरीच्या बाहेर येताच कोल्ह्याने जंगल भागाकडे धूम ठोकली.

To Top