खोपोली : अमर मनकावले
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक गणपती पैकी एक असणाऱ्या पालीच्या बल्लाळेश्वार येथुन सर्वांचे लक्ष वेधणारा सरसगडाच्या बाले किल्ल्यावरून भगवा स्वराज्य ध्वज हाती घेत शंभु राजेंना वंदन केले.
या मोहिमेची सुरुवात पहाटे साडे तीन वाजता बल्लाळेश्वर मंदिर, पाली येथुन झाली. रात्रीच्या काळोखात टॉर्च लाईटचा वापर करीत मार्ग काढण्यात आला. जंगलातील खड्या चढाईचा टप्पा संपल्यावर कातळात कोरलेल्या ९६ पायऱ्यांचा मार्ग प्रवेशद्वारातून वर घेऊन जातो. येथुन एका निसरड्या पाऊल वाटेने मार्ग काढत साडे पाच वाजेपर्यंत बाले किल्ला सर करण्यात आला.
सुर्य नारायणाचे दर्शन होताच बाले किल्ल्यावरील महादेव मंदिरासमोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय, हर हर महादेव या घोषणा देण्यात आल्या. बाले किल्ल्यावरून थोडेसे खाली येऊन महादरवाज्यातुन खाली जात तेथे असलेल्या कातळ कोरीव गुहा आणि पाण्याचे टाके यांना भेट देण्यात आली. येथुन पुन्हा महा दरवाज्यातुन वर येऊन दिंडी दरवाजा व बुरुज, पाण्याचे टाके, चोर दरवाजा यांना भेट देण्यात आली.
रात्रीच्या अंधारात भटकंतीचा आनंद घेत आणि दिवसा उष्णतेच्या लाटेचा सामना करीत गडावरील सर्व वास्तुंना भेट देत किलोमीटरची पायपीट करण्यात आली. या मोहिमेत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सचे जॅकी साळुंके, अनिष पाटील, माधवी पवार, प्रिती फडके, आशिष कुमार, भुषण चौगुले, प्रज्वल पाटील, अशोक कांबळे, अतुल अर्जुनवाडकर, आभा सिंग, अमित कोटियन, सुरेश सावंत, रोहित माने, अमित मालकर आणि डॉ.समीर भिसे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.