बारामतीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारावर लाखोंचा सट्टेबाजार ? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : adv. गणेश आळंदीकर
बहुचर्चित व देशपातळीवर गाजलेली बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दि. ७ मे रोजी पार पडली. विजयी उमेदवारांचे भवितव्य मत पेट्यामधून अडकले असतानाच एरवी क्रिकेटसाठी सट्टा लावणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यावर सट्टा लावायची तयारी केली असून मराठवाड्यातील एका मोठ्या शहरात बुकिंनी मतदानोत्तर निकालांच्या शक्यतेची तपासणी सुरू केले आहे. 
        क्रिकेटमध्ये ,घोड्यांच्या रेस मध्ये जसा सट्टा लावला जातो तसा सट्टा पहिल्यांदाच बारामतीचे निवडणूकीवर लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील एका मोठ्या शहरातून सट्टेबाज तयार झाले असून लाखो  रुपयांची उलाढाल होईल अशी शक्यता आहे. बारामतीचे इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंबियांचे दोन पक्ष झाले. सुप्रिया सुळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार केला. तर अजित पवार यांनी विकास कामाचा प्रचार केला. अजित पवार यांच्या गटाला वेगवेगळ्या संस्थांवर असलेले कार्यकर्ते ,पदाधिकारी, कंत्राटदार यांची ताकद असल्याने त्यांचे पारडे जड वाटत होते. मात्र शरद पवार यांच्या सांगता सभेत झालेली प्रचंड गर्दी , सर्वसामान्य लोकांची अजित पवार यांनी भारतीय जनता पक्ष सोबत युती केल्याने झालेली नाराजी यामुळे ही लढत अटी तटी ची झाली. बारामतीकर प्रथमच या लढाईत द्विधा मनस्थितीत पडले.  घराघरातून देखील वडील एकीकडे तर मुलगा दुसरीकडे असे चित्र पहावयास मिळाले. येथील जनतेने कायमच पवार कुटुंबीयांवर प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही पवार हवे आहेत. अजित पवार यांच्या विकासाची गती, कामाचा उरक तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित करतो तर पवार साहेब सत्तेत असले नसले तरी केंद्रात त्यांचे चालते ही धारणा जनतेच्या मनात आहे. सुप्रिया ताईंना लोकसभेचा असलेला अनुभव तसेच बापाला घरातून काढले असे म्हणणारी ग्रामीण जनता.. यामुळे सुप्रिया ताईंचे पारडे जड झाले. खरं तर बारामती मतदारसंघातील खडकवासला , दौंड ,इंदापूर, पुरंदर, भोर इत्यादी भागातील राष्ट्रवादी विरोधात लढलेली जनता कसा कौल देते यावर देखील उमेदवारांचा विजय अवलंबून आहे. प्रचाराच्या शेवटच्या सांगता सभेमध्ये रोहित पवार भावूक झाले, अजित पवारांनी त्याची मिमिक्री केली, सुप्रिया ताई अजित दादांच्या घरी भेटीला गेल्या.. अगदी वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी झाल्याने बारामतीकर नाराजा झाला. त्यामुळे मतदान झाले अवघे ४७ टक्केच .टीकाटिप्पणी सह झालेल्या घडामोडींमुळे मतदार पूर्णपणे संभ्रमावस्थेत होता. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विजयाची खात्री व्यक्त केली असली तरी प्रत्यक्ष चार जूनलाच मतमोजणीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 
       दरम्यान बुकींनी /सट्टेबाजांनी मात्र या परिस्थितीचा फायदा घेत सट्टेबाजार सुरू करण्याची तयारी केली असल्याची माहिती मिळत आहे. कुणी सुप्रिया सुळेंवर सट्टा लावत आहेत तर कुणी सुनेत्रा पवारांवर. कुणाचाही विजय झाला तरी पहिल्यांदाच बारामतीकर मात्र पराभूत होणार आहे.   
To Top