सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलय… आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा ..निवडणूक आयोग दिसतंय ना? सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल अशा आशयाची पोस्ट करत त्याखाली पिडीसीसी बँक वेल्हे शाखेचा फोटो आमदार रोहित पवार या सोशल मीडिया आयडीवरून प्रसारीत केल्यानंतर याची चौकशी करत बॅंकेच्या सीसीटीव्ही फुटेज आधारे वेल्हे तालुक्यातील फिरते भरारी पथकाचे पथक प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर, कृषी सहायक वेल्हे कृषी विभाग यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
विनायक तेलावडे असे बँक व्यवस्थापकाचे नाव असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार यांनी ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती वेल्हे शाखा बँक सुरू असल्याची पोस्ट केली होती. त्यानुसार आज मंगळवार(दि. ७ मे) रोजी सकाळी वेल्हे तालुक्यातील फिरते भरारी पथकाचे पथक प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर, बॅंकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यानंतर बँकेमध्ये सीसीटीव्ही फुटेज नुसार काल सोमवार(दि. ६ मे) रोजी बॅंकेच्या कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर बँके मध्ये चाळीस ते पन्नास व्यक्ति संशयास्पद स्थितीत संचालक यांच्या केबिनजवळ ये जा करीत असल्याचे दिसून आले .
बँकेची वेळ संपल्यानंतर विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन लोकसभा निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर करीत आहेत.