सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : विजय लकडे,
कर्नलवाडी (ता. पुरंदर ) येथील शरदविजय सोसायटीत मागील दोन-तीन वर्षापासून लाखो रुपयांचा गैरव्यवहार सुरू आहे. याबाबत जिल्हा बँकेने आणि सहकार खात्याने तोंडावर बोट ठेवले आहे. यामुळे सोकावलेल्या सचिवाने आत्तापर्यंत सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या नावे परस्पर बोगस कर्जे उचलले आहेत.जवळपास दीड कोटींचा हा गैरव्यवहार असून शेतकऱ्यांनी हातापाया पडून निम्मी रक्कम भरून घेतले आहे.
पुरंदरच्या नावाजलेल्या शरदविजय सोसायटीत सत्तांतरानंतर मंगेश सुभाष निगडे यांच्या गळ्यात सचिव पदाची माळ पडली आणि भ्रष्टाचार फोफावला. मे-२०२२ मध्ये ज्ञानदेव निगडे तर मे-२०२३ मध्ये बाळासाहेब निगडे अध्यक्ष झाले. सन २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालातच ३२ शेतकऱ्यांच्या नावे पुणे जिल्हा बँकेच्या निराशाखेद्वारे बोगस पद्धतीने ४४ लाखाचे दुबार कर्ज वाटप केल्याचा पहिला अपहार उजेडात आला. शेतकऱ्यांनी कर्जे "निल" केली तरी त्यांच्या नावे बोगस कर्ज सचिवाने उचलल्याचे आणि पैसे लंपास केल्याचे निष्पन्न झाले. संचालक मंडळाने वार्षिक सभेत चर्चा न करता विषय झाकून नेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी, संचालकांनी हातापाया पडून गेल व्यवहाराची रक्कम भरून घेतली. सचिवाने ऑगस्ट अखेर पर्यंत २६ लाख ५७हजार तर सप्टेंबर अखेरपर्यंत 1१७लाख ४५ हजार रुपये भरले आणि ३२शेतकऱ्यांनी सुटकेचा निष्वास टाकला.
परंतु मार्च २०२३ नंतरही सचिव आणि त्यांची संबंधित साखळी कार्यरत राहिली. आता मार्च २०२४ पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल येईल तेव्हा वास्तव समोर येईलच. मात्र आत्ताच शेतकऱ्यांनी, जिल्हा बँक, पोलीस, सहकार खाते यांच्याकडे आपल्या नावे बोगस कर्ज असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकरी जवळपास अडुसष्ट असून, गैरव्यवहाराचा एक कोटीचा अंदाज आहे. या ६८ जणांपैकी सात शेतकऱ्यांचे तेरा लाख रुपये मार्च अखेर तर अठरा शेतकऱ्यांचे अठरा लाख २० मे रोजी जिल्हा बँकेच्या निराशाखेत भरले आहेत उरलेले पन्नास शेतकऱ्यांनाही तब्बल ५० लाख रुपयांना गंडविले असल्याचे समोर येत आहे.