सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या अहमदनगर जिल्ह्याकडे होत असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. करत रुपये १२ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क व दौंड विभागाची ही धडक कारवाई केली.
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ. विजय सूर्यवंशी संचालक (अं.व.द.) प्रसाद सुर्वे यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने आज रोजी गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या अहमदनगर जिल्ह्याकडे होत असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने मोहिम राबवून, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान आज दि. १६ रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड विभागातील निरा-मोरगाव रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिका नजिक संशयित वाहन क्र. एमएच १६ सीडी ५४१९ हे बोलेरो पिक-अप वाहन व वाहन क्र. एमएच १२ एमएफ ६५७५ ही युंदाई कंपनीची क्रेटा गाडी थांबवून वाहन चालकांकडे वाहनामध्ये काय आहे, याबाबत चौकशी केली असता, दोन्ही वाहनचालक यांनी समाधानकारकपणे उत्तर न दिल्याने वाहने रोडच्या बाजूला घेऊन तपासणी केली असता, वाहनामध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले विविध विदेशी मद्य ब्रँडचे एकूण १२ लाख ६१ हजार रु. किंमतीचे विदेशी मद्य तसेच दोन चारचाकी वाहने अं. किंमत रु. १७५००००/- तसेच दोन मोबाईल हँडसेट अं. किंमत ६००००/- असा एकूण रु. ३०७१०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा मद्यसाठा अहमदनगर जिल्ह्यात विक्री करण्याचे उद्देशाने परराज्यातून वाहतूक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०,८१,८३,९० व १०८ अन्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड यांचेकडील गु. र. क्र. १२८/२०२४ दि. १६/०६/२०२४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर आरोपीमध्ये नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर जिल्हा) यांना अटक केली.
सदर कारवाईत निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, जवान शुभम भोईटे, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान नवनाथ पडवळ, जवान अशोक पाटील, जवान चंद्रकांत इंगळे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रदीप झुंजरुक (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड- २) हे करत आहेत.