आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीमंडळात संधी मिळावी : सातारा-जावली मतदार संघातील कार्यकर्त्यांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : धनंजय गोरे 
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची कामगिरी सुमार झाल्याने येणाऱ्या  विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची राजकीय क्षेत्रात जोमाने चर्चा सुरू असून लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारे सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे खाते मिळणार असल्याची खात्री कार्यकर्त्यांना आहे. मंत्रिपदासाठी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव आघाडीवर आहे.
          सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे निवडून आले.अटीतटीच्या लढतीत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत करून सातारचे भाजपचे पहिले खासदार म्हणून यश मिळवले. एकीकडे सातारा जिल्ह्यात कराड, पाटण वाई या तालुक्यात भाजपला तुलनेने कमी मतदान मिळाले. जावळी हा शशीकांत शिंदे यांचा हक्काचा स्वतः चा तालुका आहे.मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे यानी जोमाने प्रचार यंत्रणा राबविल्याने आमदार शिंदे यांना सातारा-जावळी तालुक्यात जास्त मताधिक्य घेता आले नाही. महायुतीचे आमदार असलेल्या वाई, पाटण या मतदारसंघपेक्षा सातारा-जावळी मतदारसंघात उदयनराजेंनी सर्वाधिक लीड घेतले. या मागे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे  ते प्रामाणिकपणे काम करतात असा आजवरचा राजकीय अनुभव आहे.
      लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याने मंत्रिमंडळ विस्तारत चांगले काम करणाऱ्या आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून भाजपचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांचा मंत्रिमंडळ  विस्तार करताना प्राधान्याने विचार झाला पाहिजे,अशी मागणी सातारा-जावळी तालुक्यातील बाबाराजे यांचे निष्ठावान कार्यकर्ते करत आहेत. महायुतीचे सरकार आले तेव्हा सुद्धा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव मंत्रीपदासाठी आघाडीवर होते. मात्र  त्यांना त्यावेळी संधी मिळाली नव्हती.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करायचे असेल तर तळागाळात प्रभावी जनसंपर्क असलेल्या बाबाराजेंची मंत्रीपदावर वर्णी लागली पाहिजे, असा आग्रह कार्यकर्ते धरत आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा भाजपने सन्मान करावा, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत
To Top