सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
संपादकीय : महेश जगताप
पाच वर्ष तीने धीर धरला.. कदाचीत त्याहून जास्त. तिला कदाचित वाटत असावे आपल्याच्याने काही होणार नाही. या दडपशाहीचे, अवमान, अवहेलना, विटंबना आणि अपमानाचे आपण कधीच उत्तर देऊ शकणार नाही. पण नियतीने तिला संधी दिली. तिच्या बांधवांना दहशतवादी देशद्रोही म्हणणारी, तिच्या आईला शंभर रुपयांच्या औकातीची म्हणणारी कंगना राणावत तिच्या टप्प्यात आली आणि तिने मागचा पुढचा विचार न करता चारचौघात मुस्काट फोडलं. ही सणसणीत चपराक केवळ कंगणाच्या थोबाडीत नाही, ती ज्यांच्या जोरावर माज, मस्ती, मग्रुरी दाखवते त्यांना सुध्दा होती.
कुलविंदर कौर हरियाणातल्या गावखेड्यातली शेतकर्याची पोर.चंदिगडच्या एअरपोर्टवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी. घरची परिस्थिती गरीबच असावी. अन्यथा सुरक्षारक्षक म्हणून कशाला काम करेल? घरी जेमतेम शेती असावी.आई वडील शेतकरी. शेतमालाला हमीभाव नाही. शेती परवडत नाही. त्यातच सरकार नवी कृषी धोरणे आणून शेतकर्यांना देशोधडीला लावायला निघाले. म्हणून कुलविंदरचे आई, बाप, भाऊ असे सगळे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करायला उतरले. एक-दोन दिवस नाही, आठ दहा महिने. सरकार त्यांच्याकडे ढुंकून पहायला तयार नाही. उलट त्यांनाच दहशतवादी, अतिरेकी, पाकिस्तानी घुसखोर, नक्षलवादी, देशद्रोही ठरवायला निघालेले. त्यांच्या रस्त्यावर तारांची कुंपणे, सिमेंट ब्लॉकचे ढिगारे, खीळे, खड्डे, अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे, बंदूका घेऊन हजारो पोलिस रस्ते रोखून उभे. आंदोलकांना प्यायला पाणी मिळणार नाही असा तगडा बंदोबस्त. वीज इंटरनेट तोडलेले. पुन्हा छुपे पोलिस, कॅमेरे, ड्रोन, पढवलेला मिडिया, असं सगळं चक्रव्यूह सभोवती. दंडेलशाही, दडपशाही साम, दाम, दंड, भेद असं सगळं. तरी आंदोलक घरदार गाव, शेतीभाती, कामधंदे सोडून आंदोलन करताहेत. न्यायासाठी, हक्कासाठी.
आणि कोण कुठली राणावत म्हणते “अशा आंदोलनात बसायला बाया शंभर रूपये भाड्याने मिळतात”. भाड्याने.. म्हणजे कंगणा जशी थोडे जास्त भाडे घेऊन जशी कोणतेही रोल करते तसे. असे म्हणणार्या छम्मकछल्लोची खरे तर जीभच छाटायला हवी. कुलविंदर कौरला हेच वाटले असेल. जेंव्हा कंगणा तीच्या आईला शंभर रुपयांच्या भाडोत्री औकातीची म्हणाली तेंव्हा. पण तीने संयम राखला. धीर धरला. वाट पाहिली. एक दिवस आपलाही येईल याची खात्री होती तीला. आणि ती वेळ आली. कंगणा तिच्या समोर होती. खासदार झाल्याच्या विजयी उन्मादात. पण आता तिच्या मागे उभ्या असलेल्या दडपशाहीच्या हत्तीला अंकूश लागलेला होता. आता तिचा तोरा चालणार नव्हता. हीच वेळ होती उत्तर देण्याची. आणि तिनं ते दिलं. धीराने पण जोराने.