सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यासह विविध पदे रिक्त भरली गेली नसल्याने जावली तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेचे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जावली तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २४ आरोग्य उपकेंद्रे असून यातील आरोग्य सेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व इतर पदे रिक्त आहेत. परिणामी गाव तसेच वाड्या, वस्त्यांवर आरोग्य सेवा पुरवताना अडचणी येत आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
जावली तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आणि डॉ. भगवान मोहिते यांच्याकडे जावलीचा अतिरिक्त भार असल्याने तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून रिक्तपदे भरली जात नाहीत. येथे आरोग्य सेविकांची तब्बल आठ पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, डिलिव्हरी, कुष्ठरोग, क्षयरोग, कुटूंब कल्याण या कामांचे उद्दीष्ट राखण्यासाठी रिक्त जागी नेमणुका होणे गरजेचे आहे. केळघरसाठी दोन डॉक्टरांची गरज आहे. परंतु, तेथे एकाच डॉक्टराची नियुक्ती आहे. त्यात समुदाय अधिकारी यांचीही जागा रिक्त आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांची कामे रखडतात. काही ठिकाणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या जागाही भरलेल्या नाहीत. यामुळे अनेक ठिकाणी कार्यालयीन कामे खोळंबत आहेत. शिपाई नसल्याने साफसफाई व इतर कामे होत नाहीत.
दुर्गम भागातील लोक हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच विसंबून राहतात. परंतु त्यांना योग्य प्रकारे आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. ग्रामीण रूग्णालयातही अनेक जागा रिक्त आहेत.
मेढा येथे लाखो रुपये खर्च करून शासनाने आपला दवाखाना सुरु केला. पण, तीन महिने हा दवाखाना डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेत आहे. यामुळे मोफत औषध उपचार रुग्णांना मिळणार कधी? असा सवाल आहे. कुठे खर्च केला जातो ? काही कर्मचारी रुग्ण कल्याण समितीचे कामकाज आहे असे सांगून तालुक्याच्या कार्यालयात सारखे हेलपाटे मारत असतात. उपकेंद्र स्तरावर शुगर व बीपीची औषधे उपलब्ध होत नसल्याने यावर उच्यस्तरीय समिती नेमून योग्य तो अहवाल द्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
आरोग्य सेविका उपलब्ध नसल्याने अनेकदा आरोग्य उपकेंद्रे बंद असतात. त्यामुळे दूरवरुन येणाऱ्या रुग्णांना परत जावे लागते. त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. शिवाय वेळ व पैसा देखील वाया जातो. तालुक्याच्या विभागातील सर्व रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.