सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील श्री क्षेत्र कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहणांना सेवा कर भरावा लागणार आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमी ये जा होत असते अशा वेळी लांबुन येणारे भक्तगण स्वतःचे वाहन आणत असतात. कोणी दोन चाकी कोणी चार चाकी तर काही वेळा मोठया बसेस घेवून भाविक श्री काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून परिसरात स्वच्छता राखली जात नाही. परिसर अस्वच्छ होत असल्याने गावामध्ये रोगराई होवू नये यासाठी सरपंच मारुती चिकणे, उपसरंपच निवृत्ती मोरे व काळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे यांनी निर्णय घेवून परीसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या वाहनांना सेवा कर बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अंमल बजावणीस सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रामपंचाय कुसुंबी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दोनचाकी वाहनास तीस रुपये व चार चाकीस पन्नास रुपये सेवा कर आकारण्यात आला आहे. सरपंच मारुती चिकणे सह ग्रामपंचायत सदस्य, विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सेवा कर योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून श्री क्षेत्र कुसुंबी येथे येणाऱ्या वाहन धारकांना आता सेवा कर भरावा लागणार आहे.