सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आषाढी वारी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यालय मध्ये ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्माई तसेच ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, जनाबाई इत्यादी संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारून साक्षात पालखी सोहळ्याचे स्वरूप या ग्रंथ दिंडीला आले होते.
विद्यालयाच्या ढोल, ताशा लेझीम पथकाने पालखीचे मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा केली. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी वाणेवाडी गावाची ग्रामप्रदक्षणा केली. ग्रामस्थांनी या ग्रंथदिंडीचे रांगोळ्या काढून तसेच या ग्रंथदिंडीचे औक्षण करत स्वागत केले.यानंतर विद्यालयाच्या मैदानामध्ये पालखीचे रिंगण साकारण्यात आले. टाळ,पताका, तुळशी वाल्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा जयघोष करत पालखीला रिंगण घातले. शाळेच्या मैदानावरती फुगड्या घालत विद्यार्थ्यांनी या दिंडीचा आनंद घेतला. विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थी वारकऱ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती. याचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सीमा पवार व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. प्राचार्य श्री संजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथदिंडी साठी शुभेच्छा दिल्या.