सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या हिर्डोस मावळ खोऱ्यात वरंधा घाटमाथ्यावर दोन-तीन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस समाधानकारक सुरू असल्याने खरिपातील भात लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे.
तालुक्याच्या पश्चिमेकडील मिनी कोकण समजल्या जाणाऱ्या हीर्डोस मावळात शेतकऱ्यांनी उन्हाळा संपताच धूळ वाफेवर भात रोपांचे तर्वे टाकले होते.महत्वाचे खरिपात घेतले जाणारे इंद्रायणी, कर्जत, रत्नागिरी २४,काळीसाळ या जातीचे भात रोप सद्या लागवडी योग्य झाल्याने तसेच शेतात लावणीसाठी पाणी साचल्याने शेतकरी भात लागवड करीत आहेत. आठ दिवसांपासून भात रोप लावणी योग्य झाले होते.मात्र हीर्डोस मावळ खोऱ्यातील हीर्डोशी, कोंढरी,/वेणुपुरी, दुर्गाडी, शिरवली गुढे- निवंगन,कंकवाडी, दापकेघर,रायरी,साळव,धारंबे, परहर येथील शेतकरी वर्ग लावणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होता. तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिमझिमिमुळे सर्वत्र शेतांमध्ये पाणी झाले आहे.त्यामुळे बहुतांशी शेतकरी शेतातील भात रोप काढणी करीत आहेत तर अनेकजण भात लागण करू लागले आहेत.त्यामुळे घाट माथ्यावरील परिसर शेतातील भलरींच्या आवाजाने दुमदुमून गेला आहे.
-----------------
बैल जोडीचा अभाव यंत्राच्या साह्याने चिखलनी
पूर्वीच्या काळी शेतातील मशागतीसाठी बैलजोडी उपलब्ध होती.मात्र सध्याच्या काळात बैलजोडी अभावी यांत्रिकीकरणाच्या साह्याने शेती मशागत केली जात आहे.तर प्रामुख्याने पावसाळ्यात भात लागवडीसाठी शेत चिखलणी करण्यासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे असे कोंढरी येथील शेतकरी मारुती कालवणकर व दगडू पारठे यांनी सांगितले.