लोणंद : प्रतिनिधी
लोणंद-शिरवळ रोडवरील गोळेगाव फाट्याजवळ भरधाव कारचालकाने चिरडल्याने गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार दत्तात्रय कराडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, लोणंद एमआयडीसी जवळील गोळेगाव फाट्याजवळ दत्तात्रय गोपाळ कराडे वय २७ रा. कराडवाडी ता. खंडाळा हा आपल्या एमएच ११ डिके ०३७० या दूचाकीवरून लोणंदच्या दिशेने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या शेव्हरलेट सेल एमएच ११ बीएच ५३०० कारने चिरडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान अपघात केलेला कारचालक पसार झाल्यामुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी चालकास तात्काळ अटक करण्याची मागणी केली. लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत दत्तात्रय गोपाळ कराडे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेबाबत दिलीप नबाजी कराडे रा. कराडवाडी ता. खंडाळा यांनी फरार कारचालक विक्रम विठ्ठल चोरमले याच्याविरुद्ध लोणंद पोलीसांत दिली असून लोणंद पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS