सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
सातारा जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या वाढीच्या दृष्टीने प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मागील वर्षभरात तब्बल ५०० हून अधिक कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यासाठी दिला आहे.
या निधीतून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासह किल्ल्यांचा विकास व जतन केले जाणार आहे. तसेच कोयना, पाटण, कास पठार, ठोसेघर, बामणोली, महाबळेश्वर येथे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यातून आगामी पुढील २ ते ३ वर्षांत १ ते २ हजार कोटींची अर्थव्यवस्था निर्माण होऊन जिल्ह्यातील पर्यटनासाठी चालना मिळणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकास आणि येथील पर्यटनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक धोरणात्मक आणि विकासाचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये प्रतापगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचाही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात प्रतापगड विकास आराखड्यात १२८.१५ कोटींच्या कामांचा समावेश असून, त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. या किल्ल्याचे वैभव जतन करण्यावर विशेष भर असेल. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर येथे अनेक भाविक भेट देत असतात. तेथे पाच नद्यांचा उगम आहे, तसेच प्राचीन शिवमंदिरे आहेत. या परिसराचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार आहे. त्यासाठी १८७.४२ कोटी रुपयांचा आराखडा असेल. त्यातून येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आदींचा समावेश आहे.