सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
मेढा नगर पंचायतीचे हद्दीतील मागास व गरीब कुटुंबाचा असलेला प्रभाग दोन व तीन मधील जनतेने दि. २ जुलै २०२१ रोजी केलेल्या कॉक्रीटीकरण मागणीकडे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष करून निव्वळ आश्वासनावर येथिल सामान्य लोकांना झुलवत ठेवले होते. परंतु त्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कामाला नुतन मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी पदभार स्विकारताच न्यायिक भावनेतून दोन व तीन प्रभागातील जनतेचा विचार करीत तात्काळ पिण्याच्या पाण्याच्या हातपंपाच्या बाजुचे कॉक्रीटीकरण करून दिले. येथिल सामान्य जनतेला चार वर्षांनी न्याय मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी पराग कोडगुले यांचे जनतेने आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्वांत छोटी नगर पंचायत म्हणून मेढा नगरपंचायीचा विचार केल्यास कामाचा निपटारा करण्यासाठी वेळ लागु नये अशी अपेक्षा येथिल जनतेची होती. काही किरकोळ कामांकडे दुर्लक्ष करीत विकास साधण्याचे काम तत्कालीन नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी केले आणि विकास केल्याचा डांगोरा पिटला. परंतु नगर पंचायत हद्दीमध्ये असलेला प्रभाग दोन व तीन मधील सामान्य लोकांनी केलेल्या हातपंपाचे बाजुने कॉक्रीटीकरणाच्या मागणीचा प्रश्न गत चार वर्षे मुख्याधिकारी व नगरसेक यांना सोडविता आला नाही.
प्रभाग दोन व तीन मध्ये साधारण शंभर ते दिडशे कुंटुबे राहण्यास आहेत. येथिल रहिवासी हातपंपाचे ( बोअरवेल ) पाणी पिण्यासाठी वापरत असतात. पावसाळ्यात पिण्याचे पाणी आणण्यासाठी या हातपंपा वर येत असताना चोहोबाजुने चिखलाचे सामाज्य असायचे. त्यामुळे हातपंपाच्या बाजुने कॉक्रीटीकरण व्हावे अशी मागणी जनतेतुन होवु लागली. परंतु तोंडी मागणी पेक्षा लेखी मागणी करण्यास तत्कालीन नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी सांगीतले. त्यामुळे दि. २ जुलै २०२१ रोजी लेखी मागणी करण्यात आली.
प्रभाग दोन व तीन मध्ये राहणारा वर्ग हा मागास व गरीब असल्याने त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. हातपंपाचे बाजुने कॉक्रीटीकरण होईल अशी आशा अपेक्षा सोडून देणाऱ्या सामान्य जनतेसाठी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी नगरपंचायतीचा पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ येथिल जनतेच्या मागणी प्रमाणे हातपंपाच्या साईटने संपूर्ण कॉक्रीटीकरण करून दिले. त्यामुळे सध्या पाऊस सुरु असताना कसलाही चिखल झाला नाही अगर इतर ठिकाणचे अस्वच्छ पाणी हातपंपामध्ये गेले नाही. हातपंपावर येणारा प्रत्येक जण मुख्याधिकारी पराग कोडगुले यांचे आभार मानत आहे.