निरा : विजय लकडे
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या नावावर २४ एकर जागेची भूमिअभिलेख कार्यालयाची नोंद झाली आहे. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भंडारा उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
कुलदैवत खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर असणारी डोंगर माथ्यावरील सुमारे २३ एकर ३९ गुंठे जागा ही १९७३ पर्यंत देवसंस्थानच्या नावावर होती. त्यानंतर सिटी सर्व्हे झाल्यानंतर ही जागा महसूल खात्याच्या नावावर नोंद झाली. देवसंस्थानच्या नावावर केवळ पाऊण गुंठा जागेची नोंद झाल्याने देवसंस्थानला विकासकामे
करणे अशक्य झाले होते.
नवीन विश्वस्त मंडळाने ही जागा देवसंस्थानच्या नावावर नोंद व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येऊन जेजुरी गडावरील २३ एकर ३९ गुंठे जागा श्री मार्तंड देवसंस्थानच्या नावे नोंद झाली आहे. याकामी विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे यांनी पाठपुरावा केला. या वेळी नोंद झालेली कागदपत्रे प्रमुख विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आली. या वेळी विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते, पोपटराव खोमणे, मंगेश घोणे, विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे उपस्थित होते.
--------------
अनेक विकासकामे होणार-----
या जागेत भविष्यकाळात गडाभोवती तटबंदी, उद्यान, द्वादश मल्हारसृष्टी, संपूर्ण गडावर वृक्षारोपण, सांडपाणी प्रक्रिया आणि गडाच्या पायरी मार्गावर असणाऱ्या व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून विकासकामे राबविण्यात येणार असल्याचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, अॅड. पांडुरंग थोरवे अभिजीत देवकते यांनी सांगितले