सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाठार स्टेशन : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे राहणाऱ्या दोन मैत्रीणी, मैत्री एकदम घट्ट, एकीच्या मनात भलतंच आलं. एकीनं डोक्यात प्लान रचला आणि इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करायचं ठरवलं. तसं तिनं एक
फेक अकाउंटही तयार केलं. त्यानंतर तिच्याशी गप्पा
मारुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरुनच प्रेमाचं सूत जुळलं. त्यानंतर मैत्रिणीनं पुढचा डाव टाकला. ज्या मुलाच्या
नावानं तिनं मैत्रिणीला प्रेमात पाडलं, त्याच मुलाच्या
खोट्या वडिलांना समोर आणलं. आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब, त्या मुलाच्या बनावट बापानं सोशल मीडियावरुन दिली. अस्तित्वातच नसलेल्या खोट्या प्रियकराच्या मृत्यूच्या बातमीनं मैत्रिणी हादरली. तिथं मागचा पुढचा विचार न करता थेट टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन तरुणीनं आयुष्य संपवलं. मैत्रिणीची चेष्ठा एवढी महागात पडली की, तिच्यामुळे तिच्याच मैत्रिणीला आपलं आयुष्य संपवावं लागलं. या प्रकरणात तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथील आहे.