सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
खडकवासला धरणातुन ओव्हरफ्लो होणारे पाणी शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे परिसरातील तलाव भरण्यासाठी सोडण्यात आले आहे. या पाण्याचे पुजन शनिवारी ( दि. २७ ) शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आले.
शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये पाण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर जुन पासुनचे हे पहिलेच आवर्तन जनाईद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचे जलपुजन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, मार्गदर्शक ज्ञानेश्वर कौले, विजय खैरे, सदस्य भानुदास बोरकर, सचिन साळुंके, ॲड, दत्तात्रय बोरकर, दिलीप खोमणे, संतोष काटे, फक्कड भोंडवे, राजकुमार लव्हे, नानासाहेब लडकत आदींच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जनाई योजनेचे उपविभागिय अधिकारी पी. डी. धुमाळ, शाखा अभियंता नवनाथ पंडीत, गणेश गायकवाड, स्थापत्य अभियंता पी. एम. आडागळे आदींसह परिसरातील गावंचे शेतकरी उपस्थित होते. मागिल महिण्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील बाजरी, कांदा, सुर्यफुल आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. मात्र अपुऱ्या पावसामुळे सुपे परिसरातील पश्चिम पट्टयातील तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे खडकवासल्याचे होणारे ओव्हरफ्लोचे पाणी जनाई योजनेद्वारे सोडल्याने खरिपाच्या पिकांना जिवदान मिळणार आहे.
सुपे परिसरात जुन महिण्यानंतर पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या परिसरातील अद्यापही तलाव कोरडे असल्याने खरिप हंगामातील पिकांना खडकवासला धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली होती.
दरम्यान जनाई योजनेचे उपविभागिय अधिकारी पी. डी. धुमाळ म्हणाले की शुक्रवार ( दि.२७ ) पासुन जनईचे साडेसात अश्वशक्तीच्या चार पंपाद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. सद्या टेल टु हेड असे पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. वरवंड तलावात पुरेसा साठा असे पर्यत मागेल त्याला पाणी देण्याचे नियोजन आहे. मात्र या पाण्याची पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरायची असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.