सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : गणेश आळंदीकर
तशा दोघीही मैत्रिणी एकीचे माहेर फलटण तालुक्यातील साखरवाडी चे तर दुसरीचे सासर फलटण चे गेल्या अनेक वर्षापासून दोघींनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सराव सातत्याने चालू ठेवला आणि अखेर २०२३ साली झालेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी आला आणि दोघींच्या ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
रेशमा हितेश जाधव/गायकवाड हिच्या पतीचे स्वप्न होते आपल्या पत्नीने शिक्षणाचा उपयोग करावा साडेतीन वर्षापूर्वी डिसेंबर २०२० मधे पती हितेश जाधव यांचे अपघाती निधन झाले. आयुष्याचा मोठा आधार हरवला.लहान मुलगा अभिराज व त्याचे भवितव्य धूसर दिसू लागले.सासरी दीर सासू सासरे, माहेरी निलेश गायकवाड व निखिल गायकवाड भाऊ व आई वडील सर्वांनी खंबीर साथ दिली.सर्वांनी तिला अभ्यासाला वेळ दिला. १० वर्षाच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत अखेर तिने सुमारे ७/८ वर्ष केलेल्या संघर्षाला यशाची किनार देत सं २०२३ साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले व जलसंपदा विभाग मधे "कॅनॉल इन्स्पेक्टर "पदी तिची निवड झाली.पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तिने या अगोदर अनेकदा पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली मात्र शेवटच्या टप्प्यात तिला अपयश यायचे मात्र चिकाटी सातत्य व चुका ओळखून दुरुस्त करण्याची तिची दृढ शक्ती यामुळे अखेर तिने यशाला गवसनी घातली.
सौ.पूजा इंद्रजित होळकर/कर्चे ही सोमेश्वर जवळील सदोबाचीवाडी ,होळ गाव ची. सासर फलटण. २०१७ साली लग्न झालेपासून ती राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग चे प्रयत्न करीत आहे. पूर्व परीक्षा पास होवून तिला अनेकदा यश हुलकावणी देत होते.तिला सात वर्षाचा मुलगा "हृदय" आहे.सासरी सासू सासरे व पती यांचा आधार तर माहेरी आई वडील भाऊ बहीण त्यांनी दिलेली साथ याचा आवर्जून आपल्या यशात सहभाग असलेचे पूजा सांगते.गेली सात वर्ष तिचा या परीक्षेसाठी संसाराचा गाडा हाकत मुलाचे संगोपन करीत तिने अखेर दिव्य यश संपादन केले. संपूर्ण राज्यात ओबीसी प्रवर्गात पूजा १० व्यां क्रमांकाने उत्तीर्ण होत सन २०२३ साली झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान झाली.तिच्या यशाने संसारात गुंतले की काहीच करता येत नाही असे म्हणणाऱ्या अनेक महिलांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
वानेवाडी गावातील पूजा माणिक गायकवाड/चौगुले हिने देखील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळवला आहे. ती देखील विवाहीत असून प्रापंचिक जबाबदारी सांभाळून तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे वानेवाडी गावात पहिलीच महिला पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान तिने मिळवला आहे
सोमेश्वर परिसरातील तिसरा मेंढपाळाचा मुलगा युवराज बाळासाहेब गडदरे हा देखील गेले चार वर्ष अभ्यास करीत होता. घरची परिस्थिती गरीब असताना देखील परिस्थितीचे कारण न सांगता यशस्वी होण्यासाठी सातत्य व चिकाटी पूर्ण अभ्यास केल्याने त्याची निवड लोकसेवा आयोगाद्वारे झालेल्या याच परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी झाली आहे.
विशेष म्हणजे या सर्वांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.ग्रामीण भाग, पोषक वातावरण, घरची परिस्थिती साधारण अशी अनेक कारण देऊन अनेक जण यशासाठी प्रयत्न करायचे सोडून देतात त्यांच्यासाठी या सर्वांचे उदाहरण प्रेरणादायी ठरेल असंच आहे.