सोमेश्वर रिपोर्टर टीम-- ---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर मंदिरात अमावस्या निमित्त दर्शनाला निघालाय दुचाकी हळू चालवा; कारण करंजेपूल ते गायकवाड मळा या टप्प्यात रस्ता चिखलमय झाला असून एका मागोमाग एक दुचाकी घसरून पडत आहेत आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
सोमेश्वर मंदिराला करंजेपुलच्या चौकातून गायकवाडमळा-करंजेगावमार्गे जावे लागते परंतु या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आता भर पडली आहे ती चिखलाची. करंजेपूल ते गायकवाड मळा या पट्ट्यात डांबरी सडकेवरील पाणी निचरा होत नाही. विशेषता आठवडा बाजार तळाजवळ जास्त राडाराडा झाला आहे. यामुळे या रस्त्यावरून मोठी वाहने चिखल घेऊन येतात आणि रस्ता चिखलमय होतो. यामुळे आज सकाळपासून जवळपास ४०-५० दुचाकी या टप्प्यात घसरून पडले आहेत. अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांनी दुचाकी अत्यंत सावकाश व काळजीपूर्वक चालवणे आवश्यक आहे. श्रावणात या रस्त्याने वर्दळ वाढणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे