सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांना नुकताच सहकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल विक्रम भिलारे यांचे सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
श्री क्षेत्र आळंदी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था रायगड विभाग यांचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सहकार रत्न पुरस्कार विक्रम भिलारे यांना देवून नुकतेच गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन यावेळी भिलारे यांना गौरवण्यात आले. सातारा जिल्ह्याचे साने गुरुजी असा ज्यांचा नामोल्लेख होत असतो असे ज्येष्ठ गांधीवादी नेते स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार स्वर्गवासी भि.दा. भिलारे गुरुजी यांचे घरात जन्म घेऊन त्यांचे विचारांचा अखंड वारसा विक्रम भिलारे जोपासत आहेत. 1973 चे सुमारास महाराष्ट्रातील थोर संत ह. भ. प. वै. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी कष्टकरी कामगार वर्गाचे आर्थिक उन्नती करिता मुंबई नगरीत स्थापन केलेल्या आणि सहकारी बँकिंग व्यवसायामध्ये अग्रगण्य असलेल्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन म्हणून कार्यरत राहून भिलारे यांनी 2023-24 या वर्षात आपल्या कुशल अशा नेतृत्वाखाली या बँकेला सहकारी बँकिंग व्यवसायामध्ये एक मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांना 2023-24 या वर्षाकरिता सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प नामदेव महाराज जाधव यांचे बरोबरच या विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जावळी सहकारी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल विक्रम भिलारे यांचे जावळी सहकारी बँक परिवारातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.