सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर-खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या कान्हवडी ता.खंडाळा येथील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील स्नेहा संजय चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.
स्नेहा हीने कान्हवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजगड ज्ञानपीठच्या सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापूर तसेच अनंतराव थोपटे महाविद्यालयात भोर येथे शिक्षण घेत तसेच आजोबा हनुमंत चव्हाण यांच्या बरोबर शेतीचे धडे घेवून जिद्द,चिकाटी,सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.गरीब शेतकऱ्याची मुलगी उपनिरीक्षक झाल्याने खंडाळा तसेच भोर तालुक्यातील शिक्षण घेत असलेल्या मुलींना चांगलीच प्रेरणा मिळणार आहे.स्नेहाने कान्हवडी गावातील प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान मिळवल्याने स्नेहाचा कान्हवडी ग्रामस्थ व शक्तीमान सेवा मंडळाच्यावतीने सन्मान केला गेला. तर लहान थोरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शासकीय नोकरीचा होता निर्धार
लहानपणापासून स्नेहा हुशार असल्याने शासकीय सेवेत जाण्याचा तिचा निर्धार पक्का होता.मुलांसाठी शेतीत केलेल्या कष्टाचे चीज झाले.खूप आनंदही होत आहे असे सोमेश्वर रिपोर्टरशी बोलताना स्नेहाचे वडील संजय चव्हाण यांनी सांगितले.