सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने सन २०१८-१९ या हंगामातील कपात केलेली परतीची ठेव (डिस्टलरी विस्तारवाढ ठेव) नुतनीकरण न करता ती दिवाळीसाठी सभासदांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत बारामती तालुका भाजपचे अध्यक्ष पी के जगताप, सातारा जिल्हा किसान मोर्चा, भाजपाचे सरचिटणीस शंकरराव दडस, पुरंदर तालुका भाजपाचे सरचिटणीस बाळासाहेब भोसले, उद्योग आघाडी अध्यक्ष, बारामती तालुका भाजपाचे बाबुराव गडदरे, पुणे जिल्हा अल्पसंख्याक भाजपाचे अध्यक्ष खलील काझी व बारामती तालुका सहकार आघाडी चे संपतराव भोसले यांनी सोमेश्वर कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना लि. वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६/०९/२०२४ रोजी होत असून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय क्र.७ सभासदांची ठेव नूतनीकरण न करता ती सभासदांच्या खात्यावर दिपावलीसाठी वर्ग करण्यात यावी. कारखान्याची आर्थिक स्थिती राज्यात चांगली असताना सभासदांच्या या ठेवीच्या मुदत संपली असताना सदर ठेव दिपावलीपूर्वी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. तसेच डिस्टलरीची क्षमता वाढविण्यासाठी निघालेले संचालक मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे प्रकल्प अहवाल न ठेवता मंजुरी घेत आहेत.
तरी आपणाकूडन वाढीव होणाऱ्या डिस्टलरीच्या प्रकल्प अहवालाची प्रत वार्षिक सभेपूर्वी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.