सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संविधान मार्गाने संविधानाची पायमल्ली सुरू आहे. संविधानिक काम करावं लागेल,
सगळया संस्था बदलून टाकल्या जात आहेत. माध्यमांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. पूर्वी लोक नेता निर्माण करायचे आता मीडिया नेता निर्माण करते असे मत पुणेचे दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता. बारामती येथे भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संघटनेच्या शंभराव्या ज्ञान विज्ञान गप्पा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. याप्रसंगी भाज्ञावीस चे राज्य सचिव दीपक मांडेकर, विनायक कदम, राजेंद्र जगताप, भारत खोमणे, मदन काकडे, बाळकृष्ण भापकर, वृषाली कोरडे, एस. एस. गायकवाड, अण्णा जाधव, ऍड. अजित कोकरे, किरण आळंदीकर, धैर्यशील काकडे, प्रा. बाळासाहेब जगताप, कांचन निगडे, भीमराव बनसोडे, वैभव गायकवाड, गणेश साठे श्रीकृष्ण कुदळे, अनिल चाचर, ऍड. नवनाथ भोसले, रंगनाथ नेवसे, दीपक साखरे उपस्थित होते.
पुढे आवटे म्हणाले, नेहरूंनंतर देशात मनमोहनसिंग हे सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान होते, द्रष्टा माणूस होता पण मीडिया व विरोधकांकडून मौनी ठरवला गेला. २०१० ला भ्रष्टाचार हा नरेटिव्ह पसरवला गेला. आण्णा हजारेंना अजून कळलं नाही त्या काळात आपण काय केलं? सब चोर है... हे आंदोलन त्या काळात पुढे आले. आणि मोदी यांचा उदय झाला. मोदींचा चेहरा विकला गेला, गुजरात मॉडेल विकल गेलं, चहावाला ही ओळख विकली गेली. आणि नेता मिळाला. पूर्वी लोक नेता निर्माण करायचे आता मीडिया नेता निर्माण करते, लोकांनीही मोदी म्हणजे गोध्रा दंगल हा अजिबात विचार न करता मतं दिली, लोकांना खरच वाटलं काँग्रेसन काहीच केलं नाही. गांधीच मॉडेल वेगळ्या पद्धतीनं मोदींनी हायजॅक केलं,
इंग्रज गेल्यावर भारत कोसळेल पण तत्पूर्वी जनवेधरी पुरुषांचं राज्य असेल असं चर्चिल म्हणाला. इंग्रज गेले आणि आम्ही आलो असं वाटलं आणि गांधी घुसल्याच राग तोच होता. आंबेडकर यांनी पहिल्या दिवशी मताचा अधिकार दिला. आंबेडकरवाद्यांना गांधी कळले नाहीत. गांधीवाद्यांना बाबासाहेब कळत नाहीत. गांधी म्हणतात, आंबेडकर भेटल्यावर मला जात व्यवस्था कळली. गांधी नेहरू आंबेडकर मतभेद होते पण मूल्ये समान होती.
सार्वजनिक शाळेत प्रवेश घ्यावा असे श्रीमंतास वाटतं त्याला विकास म्हणतात, सार्वजनिक नळाला पाणी डोळे झाकून पिऊ त्याला विकास म्हणतात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत घरच आजारी माणूस नेऊ शकतो त्यास विकास, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरू त्याला विकास म्हणायचे, लोकशाही वयात आलीय, सत्ताधारी वर्गाला त्यांच्याच पोरांना पुढं आणायचं आहे, राजकारणाचा पॅटर्न बदलावा लागेल, पण प्रकिया सावकाश होईल. भीमराव, गांधी, नेहरुंनी खूप सोसलं आहे, हा देश माझा तुमचा आहे गांधी, मोदी, पवारांचा आहे, भक्त मोदींचर नाहीत ते काका पुतण्याचे पण आहेत, गांधींचेही भक्त होऊ नका, भक्त होण्यापासून वाचलं पाहिजे असे ते म्हणाले. पुरोगामी संस्थांचा जाळ उभं रहायला हवं, संरचनात्मक काम प्रभावीपणे करणे आवश्यक,
सांस्कृतिक भुयारात राजकारण जन्माला येत, पथनाट्ये शाहिरी याच महत्त्व आहे, सांस्कृतिक विश्व काबीज करणं महत्त्वाचे असल्याचे आवटे यांनी सांगितले.
स्वागत डॉ. अजय दरेकर, प्रास्ताविक संतोष शेंडकर, सूत्रसंचालन नौशाद बागवान, आभार शशिकांत जेधे यांनी मानले.