सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण युवराज कांबळे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला असून राजीनामा अर्जात जरी घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख असला तरी या राजीनाम्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडल्या असल्याची शक्यता आहे.
येथील सोमेश्वर कारखान्याचे संचालक प्रवीण युवराज कांबळे यांचा अजून दोन वर्षां पेक्षा अधिक कालावधी शिल्लक असताना कारखान्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. कारखान्याची संबंधित गैरवर्तन केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते. पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वच संस्थांमधील संचालकांवर अंकुश निर्माण होणार आहे
सोमेश्वर कारखान्याच्या होळ गटामधून कांबळे हे अनुसूचित प्रवर्गातून ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडून आले होते. कारकिर्दीस तीन वर्ष पूर्ण होण्यास काही अवधी असतानाच आणि दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याआधीच कांबळे यांना पायउतार व्हावे लागले आहे. अजित पवार यांच्या या कारवाईमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सर्वच संस्थांमधील संचालकांना व अधिकाऱ्यांना आपल्या वर्तनावर संयम ठेवावा लागणार आहे. कांबळे यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्ताव राजीनामा देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. मात्र मागील काही दिवसापासून अनेक घडामोडी सुरू होत्या. कांबळे यांचे वर्तन चुकीचे असल्याची चर्चा होत होती सदर बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत काही संचालकांकडून पोचली. कांबळे हे कारखान्याशी अनेक दिवसांपासून संलग्न अधिकारी, कर्मचारी, सेवक यांच्याशी गैरवर्तणूक करत असल्याची चर्चा होत होती. या वर्तनाबाबत कार्यक्षेत्रातही अलीकडे चर्चा होऊ लागली होती. अजित पवार यांच्यापर्यंत संचालक मंडळाकडून याबाबत माहिती पोहोचवण्यात आली. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून आज सायंकाळी कांबळे यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
याबाबत सोमेश्वर काऱखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप म्हणाले, अजितदादा यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या. नंतर त्यांनी ताबडतोब दखल घेऊन राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार कांबळे यांनी आज सायंकाळी राजीनामा दिला आहे. अजितदादा गैरवर्तन गोष्टी खपवून घेत नाहीत. वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे कारण देत कांबळे यांनी राजीनामा दिला आहे.
---