सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची साठवी वार्षिक सर्वसाधारण सभा २६ सप्टेंबरला दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात पार पडणार आहे. डिस्टिलरी प्रकल्पाच्या विस्तारवाढीसाठी स्वनिधी उभारणे आणि शिक्षणनिधी कपात करणे अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झडणार आहे. याशिवाय गाळप हंगाम नियोजन, अभ्यास दौरे, शिक्षणसंस्था अशा विषयांवरही सभा रंगण्याची चिन्हे आहेत.
लोकशाही पध्दतीने आठ-दहा तास चर्चेव्दारे रंगणारी सभा म्हणून सोमेश्वरच्या वार्षिक सभेचा लौकीक आहे. सन २०२३-१४ या हंगामाच्या वार्षिक सभेपूर्वी संचालक मंडळाने सभासदांना ३५७१ रूपये प्रतिटन इतका स्वतःच्याच इतिहासातील उच्चांकी भाव देऊन राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट साखर उतारा, साखर विक्री, उत्तम तांत्रिक क्षमता, चांगला ताळेबंद या कारखान्याच्या जमेच्या बाजू आहेत. मागील हंगामाच्या तोडणी नियोजनाचे आणि एकूण ऊस उत्पादनाचे अंदाज चुकल्याने सभासदांमध्ये नाराजी होती. यावर संचालक मंडळाने वार्षिक सभेआधीच लागवडीचे व तोडणीचे नियोजन कसे व्हावे यावर सभासदांचे विशेष चर्चासत्र आयोजित करत आगामी हंगामासाठी अनेक सुधारणा स्वीकारल्या आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत तोडणीबाबतची चर्चा अन्य विषयांकडे वळण्याचा शक्यता नाकारता येत नाही.
सोमेश्वरने डिस्टिलरी विस्तारवाढीसाठी २०१८-१९ या हंगामात दिलेल्या ठेवीचे नूतनीकरण करणे, विस्तारवाढीसाठी नव्याने ठेव घेणे, तसेच ठेव विमोचन निधी विस्तारवाढीकडे वळविणे असे भविष्यासाठीचे महत्वाचे मदे चर्चेत आहेत रसाच्या भावावर आणि आर्थिक स्थितीवर चिंतन होण्याची अपेक्षा सभासदांना आहे. शिक्षणसंस्थेसाठी ऊसबिलातून काही रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शिक्षणसंस्थेतील कारभारावर चर्चा झडणार आहे. तसेच संचालक मंडळाचा अभ्यासदौरा व काटकसर अशा विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मागील सभेप्रमाणे अनावश्यक व किरकोळ विषयावर प्रदीर्घ रटाळ चर्चा करणे आणि त्याच त्याच कार्यकर्त्यांनी सभेचा व अभ्यासू लोकांचा महत्वाचा वेळ खाणे या गोष्टी टाळून संस्थेच्या हिताच्या महत्वपूर्ण विषयांवर सडेतोड चर्चा व्हावी अशी सभासदांची अपेक्षा आहे. अन्यथा रटाळ चर्चेमुळे मोठ्या संख्येने आलेले सभासद लवकर निघून जाणे पसंत करतात आणि रात्री उशिरा महत्वाचे विषय अक्षरशः उरकून घ्यावे लागतात असा अनुभवही सभेला वारंवार आला आहे.
COMMENTS