'बारामती'च्या 'या' 'चहावाल्या'चा रायगड मध्ये सन्मान : चहासोबत विकला पुस्तकांचा गोडवा, 'अंनिस'कडून 'शतक'वीर पुरस्कार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल (ता. बारामती) येथील श्रीनाथ अमृततुल्यचे मालक व विवेकानंद अभ्यासिकेचे मार्गदर्शक राजू रामदास बडदे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 'शतकवीर व आधारस्तंभ' असा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले.
        वडघर (ता. माणगाव जि. रायगड) येथे अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या वतीने 14 व 15 सप्टेंबर असे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर व शतकवीर-आधारस्तंभ कार्यकर्ता सन्मान सोहळा पार पडला. समारोपाला भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे कार्यकर्ते राजू बडदे यांना ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते शतकवीर व आधारस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, राजीव देशपांडे, बाळकृष्ण भापकर, डॉ. हमीद दाभोळकर, अनिल चव्हाण, राहुल थोरात, मुक्ता दाभोळकर, संतोष शेंडकर, दिनेश पिंगळे उपस्थित होते.

       बडदे हे भारत ज्ञान विज्ञान समुदायचे काम करत चहाचे हॉटेल चालवतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाळकृष्ण भापकर यांच्या मदतीने पुस्तक विक्री करतात. दोन वर्षात दोन लाखांची पुस्तके त्यांनी विकून सांस्कृतिक कार्य केले आहे. यामध्ये अंनिसच्या पुस्तकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
याबाबत बडदे म्हणाले, कोरोना काळात सगळीच कामे ठप्प झाली. भा.ज्ञा.वि.स.चे राज्य सदस्य आणि सकाळचे पत्रकार संतोष शेंडकर यांच्या कडे भरपूर पुस्तके संग्रही आहेत.ती आणून मी वाचू लागलो. त्याने माझ्यात बरेच वैचारिक बदल झाले. मग इतर लोकांना देखील पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी पुरोगामी विचारांची पुस्तके विकायला सुरुवात केली. अनिसचे भापकर सर यांची आणि भा. ज्ञा. वि. स. ची काही पुस्तके असे शाळा- महाविद्यालयात पुस्तकांचे स्टॉल लावले.  'फटाके नकोत पुस्तके हवीत' या सदराखाली पुस्तके विकली. अंनिसच्या दर महिन्याला निघणाऱ्या मासिकाच्या वार्षिक वर्गणी चे काम आनंदाने केले. यापुढेही हे काम अधिक जोमाने करत राहणार आहे, असे मत राजू बडदे यांनी व्यक्त केले.
--- 
To Top