सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
अनिल बंडु धोत्रे रा टाकरवन ता माजलगाव जि बीड याने वाईमधील संतोष जायगुडे व विजय जामदाडे रा वाई या उस वाहतुक दारांना मी मुकादम आहे. तुम्हाला उसतोड कामगार पुरवतो असे सांगुन तसा करार करुन २० लाख ४ हजार रुपये इतकी रक्कम घेतली मात्र कराराप्रमाणे उसतोड कामगार न पुरवता उस वाहतुकदारांची २० लाख ४ हजार रुपयांची फसवणुक केल्याने वाई पोलीस ठाणे येथे यातील आरोपी अनिल बंडु धोत्रे याचेवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्याप्रमाणे यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वाई तपासपथक हे टाकरवन बीड येथे गेले असता आरोपीने सदर ठिकाणाहून पळ काढला होता. तेव्हापासुन तो नाव व पत्ता बदलुन नियमीतपणे राहण्याचे ठिकाण बदलत होता. दिनांक १२/०९/२०२४ रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, आरोपी हा डिग्रजवाडी ता शिरुर जि पुणे येथे राहत आहे. बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन वाई तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांचे पथकास सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्याने त्यांनी डिग्रजवाडी येथे सापळा रचुन त्यास जेरबंद केले आहे. त्यास अटक करुन मा.वाई न्यायालयात हजर केल्यानंतर वाई मा. वाई न्यायालयाने त्यास ४ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर आरोपी याने अशाच प्रकारची इतर ठिकाणी देखील फसवणुक केल्याची शक्यता असल्याने त्याच्याकडे कसुन तपास सुरु आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहे.