सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रणाली देशमुख
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीबद्दल जनतेच्या मनात आहे तोच निर्णय घेतला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावरती काही कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करताच हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवडा जाऊ द्या, अशी टिप्पणी केली. त्यावरती लगेच एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने उभे राहत भाऊ तुंम्ही तुतारी घ्या, अशी मागणी केली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 ची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, नीरा भीमा कारखान्याने स्थापनेपासून अनंत अडचणींवर यशस्वीपणे मात करीत प्रगती साधली आहे. सध्या जरी आर्थिक अडचणी पूर्णपणे संपलेले नसल्या तरी अनेक आर्थिक अडचणी मार्गी लागलेल्या आहेत. कारखान्यावरती सभासदांची असलेली निष्ठा व सहकार्य यामुळे नीरा भीमा कारखान्याला गतवैभव निश्चितपणे प्राप्त होईल,
ते पुढे म्हणाले, सहकारामध्ये दूरदृष्टीचा विचार महत्त्वाचा असतो, आंम्ही क्षणिक विचार करीत नाही. सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची प्रगती होत असते. संस्थेचे संचालक मंडळ हे विश्वस्त आहेत. या कारखान्यामुळे अनेक संसार उभे राहिले याचा आनंद होत आहे. तसेच या परिसराचा विकास व प्रगती झाली आहे. सध्या कारखान्याचा हजारो कुटुंबांना प्रत्यक्ष -अप्रत्यक्षता फायदा होत आहे.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, गत हंगामात उसाचे गाळप कमी झाले, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. तसेच कमी वयाच्या उसाचे गाळप झाल्याने साखर उतारा कमी आला, त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी मिळाले. परिणामी, गत गळीत हंगामामध्ये कारखान्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. आगामी काळात कारखान्यास चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा अध्यक्षपदाच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या स्थिरतेसाठी आपण प्रयत्नशील असून, साखरेच्या एम.एस.पी. ( किमान विक्री किंमत ) च्या दरामध्ये व इथेनॉलच्या दरवाढी संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरा सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषणामध्ये कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करीत, कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.
या सभेत बोलताना कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी संस्था चालविताना सध्या अनेक अडचणी येत आहेत, आंम्हाला नाहक टीका सहन करावी लागत आहे. संस्था उभारून चालवणे हे सोपे काम राहिलेले नाही. मात्र तुमचे सर्वांचे सहकार्य व प्रेम या पाठबळावर संस्थांच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याची ग्वाही राजवर्धन पाटील यांनी दिली.
सभेच्या प्रारंभी श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. तसेच यावेळी बावडा परिसरांसाठी वरदान असलेला शेटफळ हवेली तलाव भरून घेतलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सभेचे अहवाल वाचन प्र. कार्यकारी संचालक सुधीर गंगे पाटील यांनी केले. सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, अनिल पाटील, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, प्रसाद पाटील, चंद्रकांत भोसले, राजकुमार जाधव, तानाजी नाईक, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, मोहन गुळवे, विक्रम कोरटकर, अजय पाटील, आजिनाथ पाटील, सुरेश मेहेर, रघुनाथ राऊत उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले.
-------------
राजवर्धन पाटील झाले भावनाविश !
तुमच्या सर्वांचा विश्वास व सहकार्यामुळे तालुक्यातील विविध संस्था टिकून असून, संस्थांची प्रगती सुरू आहे. भाऊंना संस्था चालवताना किती त्रास होतो, त्याग करावा लागतो, वेदना होतात हे मी सध्या जवळून पाहत आहे... असे सभेत बोलत असताना अचानकपणे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे भावनाविश झाले...त्यांना अश्रू अनावर झाले. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊला साथ द्या, असे आवाहन यावेळी भाषणात राजवर्धन पाटील यांनी केले.
COMMENTS