सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
सुपे येथील मुख्य पेठेतुन भक्तीमय वातावरणात रथातुन मिरवणुक काढुन श्री संत सेना महाराज आणि विठ्ठल रुख्मीणी आदी मुर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी ( दि. १६ ) करण्यात आली. यावेळी मिरवणुकी दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
सुपे येथील सिद्धेश्वर मंदीरानजीक नाभीक बांधव आणि ग्रामस्थांच्यावतीने श्री संत सेना महाराज मंदीराचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. तर सोमवारी येथे श्री संत सेना महाराज आणि विठ्ठल रुख्मीणी आदी मुर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.
यावेळी अभिषेक, होम हवन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम मोरगावचे पौराहित्य अमित प्रभुणे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना नाभीक बांधवांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सोमवारी दुपारी भोंडवेवाडी येथील भजनी मंडळाचा एकतारी भजनांचा कार्यक्रम झाला.
तर डाळींब बन येथील श्री विठ्ठल अद्यात्मिक वारकरी संस्थेतील मुले, सावतामाळी भजनी मंडळ, श्रीराम प्रसादीक भजनी मंडळ आणि कुतवळवाडी भजनी मंडळ आदी मिरवणुकीत सहभागी होवुन विठ्ठल नामाचा गजर आणि ज्ञानोबा - तुकाराम या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी ग्रामप्रदक्षिणेत हरिपाठ, भजन तर जागो जागी महिला व पुरुषांचा फुगडी खेळण्याचा कार्यक्रम झाला.
दरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार तसेच शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार तसेच सुपे येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे आदींनी संत सेना महाराज मंदीरास भेट दिली.
..................................