सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : मनोहर तावरे
बारामती तालुक्यातील मोरगाव वीज वितरण कार्यालय सध्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आले. या कार्यालयांतर्गत दोन सब स्टेशन आहेत. या ठिकाणी असलेले दूरध्वनी संच तसेच या विभागात कार्यरत असणारे स्थानिक कर्मचारी लोड शेडिंग व वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जाणीवपूर्वक ग्राहकांना उत्तर देण्याऐवजी मोबाईलच बंद करत असल्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असून राज्यातील एक प्रमुख ठिकाण आहे. मोरगाव आणि परिसरातील सुमारे दहा ते पंधरा गावांना वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन सबस्टेशन कार्यान्वित आहेत यापैकी काही गावांना मुर्टी येथून विद्युत पुरवठा केला जातो. तर अन्य काही गावांसाठी मोरगाव येथे सबस्टेशन सुरू आहे. दिवसभरातील 24 तास या ठिकाणी कर्मचारी कार्यरत असतात. अत्यंत संवेदनशील व जनसामान्यांसाठी येथील दूरध्वनी यंत्रणा महत्त्वाची ठरते. परंतु सध्या काही संकुचित वृत्तीचे कर्मचारी स्वतःच्या सोयीनुसार या मोबाईल संचाचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत.
या परिसरात पूर्व नियोजित नसलेले फोर्स लोड शेडिंग अनेक वेळा केले जाते. तसेच काही आपत्कालीन परिस्थितीत वितरण विभागाचे लाईनमन शाखाधिकारी किंवा वायरमन सब स्टेशन मधील विद्युत पुरवठा खंडित करत असतात. अशावेळी ग्राहकांना याबाबत माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत गंभीर दखल घ्यावी अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.