सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
पतसंस्थेच्या कर्ज वसुलीपोटी दिलेला धनादेश न वटल्यामुळे तरडोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर पंडित जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भातील माहिती अशी की, तरडोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर जाधव यांचे वडील पंडित जाधव यांनी काही वर्षांपूर्वी बिरोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भोंडवेवाडी येथून कर्ज घेतले होते. या कर्जास सागर जाधव जामीनदार होते. वारंवार मागणी करूनही जाधव हे कर्ज परतफेड करत नव्हते. पतसंस्थेचे अधिकारी वसुलीसाठी घरी गेल्यानंतर वसुलीपोटी सागर जाधव यांनी स्वतःच्या खात्यावरील धनादेश पतसंस्थेस दिला होता.
तो बँकेत न वटल्यामुळे संबंधित पतसंस्थेने सागर जाधव यांच्या विरोधात बारामती न्यायालयात तक्रार केली. त्यानुसार जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बारामती न्यायालयाकडून जाधव यांना पकडण्यासाठी अटक वॉरंट काढण्यात आले होते .यानुसार सागर जाधव यांना 17 ऑक्टोबर 2024 रोजी सुपा पोलीस स्टेशन कडून जाधव यांना अटक करून बारामती न्यायालयात हजर करण्यात आले होते अशी माहिती सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी दिली. न्यायालयातून जामिनावर सागर जाधव यांची सुटका करण्यात आली आहे.
नियमानुसार घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी ही ठोस भूमिका पतसंस्थेने बारामती न्यायालयासमोर मांडली आहे.