सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अज्ञात कारणाने लागलेल्या आगीत वाणेवाडी- मळशी (ता. बारामती) येथील सहा एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय शेतातील ठिबक सिंचन संच जळून गेला. सोमेश्वर कारखान्याला हा ऊस येणाऱ्या हंगामात गाळपास येणार होता. मात्र गाळप हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने जळालेल्या ऊसाचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
चालू वर्षी मंत्री समितीने राज्यातील कारखाने १५ नोव्हेंबर पासून सुरू करण्यास परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सभासदांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. बाळासाहेब भाऊसो जगताप, सुमन शिवाजी जगताप, अशोक सर्जेराव जगताप, किरण पांडुरंग जगताप, हनुमंत पांडुरंग जगताप, वैशाली नितीन चव्हाण या सर्व सभासदांचा मिळून सहा एकर ऊस आगीत जळाला. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांनी अथवा अज्ञाताने लावलेल्या आगीत हा ऊस जळाला असल्याची शक्यता सभासदांनी बोलून दाखवली. उसाच्या पिकातून शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न मिळते, त्यामुळे शेतकरी उसाला जिवापाड जपत असतो. मात्र अशा घटनांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अगोदरच वाढत्या महागाईने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच ठोस उत्पादन म्हणून शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देतो. मात्र असे नुकसान न भरून येणारे असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.