सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिवाळीसाठी
कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २४ टक्के बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाचे कामगारांनी स्वागत करत संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचा बोनस मिळाल्याने कामगार वर्गाची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी २० टक्के व संक्रातीला ४ टक्के बोनस देण्यात येणार आहे. कंत्राटी सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना ८ हजार ५०० रुपयेप्रमाणे ३४ लाख तर ६१५ कायम व हंगामी अधिकारी व कर्मचारी यांना ५ कोटी ३६ लाख ६३ हजार रुपये खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.
गेल्याच आठवड्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलापोटी सभासदांच्या खात्यावर तब्बल ६३ कोटी रुपये बिले अदा केल्याने सभासदांची दिवाळी गोड होणार आहे. सोमेश्वर कारखान्याने गत हंगामात ३५७१ रुपये असा उच्चंकी दर दिला आहे. १५ नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू होणार असून गाळप हंगामासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून सोमेश्वर १३ लाख मे.टन टनाचे ऊसाचे गाळप करणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही कामगारांनी आभार व्यक्त केले आहेत. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांचा कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार संघटनेचे नेते माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, कामगार नेते तुकाराम जगताप, अजित शिंदे, संतोष भोसले, संग्राम चव्हाण, राहुल सोरटे, हेमंत गायकवाड, भाऊसाहेब जगदाळे, योगेश थोपटे उपस्थित होते.