सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भाटघर धरणाच्या गेटजवळ असलेल्या सांगवी हिमा येथील 'महावितरण'च्या वसाहतीत (कॉलनीत) अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८ लाख ४४ हजार ३९३ रुपयांचा माल चोरुन नेला.
याबाबत भोर पोलिसांनी माहितीनुसार एमएसईबी कॉलनीत महावितरणमध्ये कार्यरत असलेले सुनील फरांदे हे शनिवार दि.२९ सकाळी फ्लॅटला कुलूप लावून गावी गेले होते.मंगळवार दुपारी ते घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर भोरचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा केल्यानंतर त्यांना सुमारे १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पाच हजारांची रोकड चोरून नेल्याचे समजले.यामध्ये गंठण, कर्णफुले, अंगठी, फॅन्सी टॉप, डोरले, हातातील कडे, नेकलेस, वेढणी, चमकी, चोकर, बांगड्या व कोल्हापुरी साज आदी वस्तूंचा समावेश आहे. फरांदे यांच्या शेजारील संभाजी सुतार यांच्या फ्लॅटचेही कुलूप तोडून त्यांच्या घरातील गणपतीची चांदीची मूर्तीही चोरट्यांनी चोरून नेली.दरम्यान, बुधवार दि .२ पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकास बोलावून घटनास्थळी तपासणी सुरु केली.याशिवाय पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात अॅक्टीव्ह असलेल्या मोबाईलचा डेटा काढण्याचे कामही सुरु केले आहे. पोलिस निरीक्षकांना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीप्ती करपे पुढील तपास करीत आहेत.