सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : सुरेश पिसाळ
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी येथील वनविभागाच्या जागेत तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आली. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत तपास करीत यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय काजळे वय ४४ रा.निरगुडे सध्या भिगवण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पुणे सोलापूर महामार्गाच्या पूर्व बाजूस मदनवाडी गावच्या हद्दीत हा खून झालेला आहे.भिगवण पोलिसांनी याची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण आणि गतिशील तपास यंत्रणा राबवून यातील एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे.तर आरोपीने खून केल्याचा प्राथमिक जबाबही दिला असल्याची माहिती मिळत आहे.संशयित आरोपी आणि मृत झालेले विजय काजळे हे एकमेकांना ओळखीचे असून रात्रीच्या वेळेस दोघे पार्टी करण्यासाठी वनविभागाच्या जागेत बसले होते.यावेळी कोणत्यातरी कारणावरून दोघात बाचाबाची झाली आणि यातूनच संशयित आरोपीने शेजारी असणारा मोठा दगड विजयच्या डोक्यात मारून जीव घेतला.तर यावेळी विजयच्या डोक्याच्या एका बाजूचा चेंदामेंदा करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत भिगवण पोलिसांत अमोल काजळे यांनी खबर दिली असून पोलिसांच्या माध्यमातून गुन्ह्याची नोंद केली जात आहे.दगडाने ठेचून खून झाल्यामुळे भिगवण येथील वातावरण ढवळून निघाले असून बारामती विभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे ,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डूनगे ,स्थानिक गुन्हा विभागाचे प्रकाश माने ,तसेच पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देवून तपासात मदत केली.सदर खून त्याठिकाणी असणार्या शाळे समोर झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.