सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रशांत ढावरे
फसवणुकीच्या एक धक्कादायक प्रकरणात, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून लोणंद येथील अनेक जणांची सुमारे कोटींची फसवणूक झाली असल्याची चर्चा सध्या लोणंद परिसरात होत आहे.
यासंदर्भात एका गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार लोणंदच्या गोटेमाळ परिसरातील एका छोट्या व्यावसायिक दापंत्याने अनेकांना शेअर मार्केट मधून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची संपत्ती गोळा केली असून मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना दरमहा ठरलेली परतावा रक्कम मिळणे बंद झाल्याने तसेच सदर व्यावसायिकाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
या दांपत्याच्या गळाला लोणंद मधील अनेक बडे असामी लागले असल्याची चर्चा आहे. त्यातील काही गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम ही खूप मोठी असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर अनेक खाजगी सावकारांकडूनही या गोरख धंद्यात पैसे गुंतवल्याची चर्चा आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली चालवलेल्या या प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर रूजलेली असण्याची शक्यता लोणंदमधील अनेकजण व्यक्त करत आहेत. अनेकांनी आपल्या कष्टाचा पैसा या जादा परताव्याच्या मोहात पडून या दांपत्याकडे गुंतवला असल्याचे समजत असून काहींनी त्यांच्याकडे आपले पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावल्याने सध्या हे दांपत्य कोणी पोलीसात तक्रार दाखल करू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजत आहे.
-----------------------
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे अनेक किस्से सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर घडलेले उघड होत आहेत. तरीही अनेकजण अधिक आर्थिक फायद्याच्या मोहाला बळी पडून फसव्या योजनेत पैसे गुंतवून कंगाल होत आहेत. यासाठी लोकांच्यात अर्थसाक्षरता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत अनेकजण व्यक्त करण्यात येत आहे.