सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगुरूनगर : प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रगड, शिराळा भुईकोट, विलासगड, बहादुरवाडी भुईकोट, बागनी भुईकोट, सांगली भुईकोट, मिरज भुईकोट, कोळदुर्ग, बानुरगड, रामगड आणि जुना पन्हाळा हे ११ दुर्ग दोन दिवसात सर करीत राजगुरुनगरच्या डॉ.समीर भिसे यांनी दुर्ग भटकंतीचे द्विशतक पुर्ण करीत तिरंग्यास मानवंदना दिली. या द्विशतकी भटकंतीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यातील दुर्गांचा समावेश आहे.
शालेय वर्षा सहलीच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी गडावर जाण्याचा पुण्ययोग आला आणि डॉ.भिसे यांच्या जीवनातील पहिली दुर्गवारी घडुन आली. ३०, जुन २०१९ रोजी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेले कळसुबाई शिखर सर करून सुरू झालेली सह्याद्रीतील घोडदौड आता आड वाटेची भटकंती करून अपरिचित दुर्गांना भेट देत अजुनही नियमीत पणे सुरूच आहे.
कोकणकडावीर/बाणवीर बनी शिंदे आणि जॅकी साळुंके या महाराष्ट्रातील प्रस्तरारोहण क्षेत्रातील सुप्रसिद्ध प्रस्तरारोहकांच्या साथीने केलेल्या भटकंतीत महाराष्ट्र देशातील कणखर राकट सह्याद्री डॉ.भिसे यांना अनुभवता आला आणि तांत्रिक सहाय्याने सर केले सुळके, दुर्ग आणि घाटवाटांवर आत्मविश्वासाने पाऊल ठेवत हा सह्याद्री जगता आला. अश्या या टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या साहसी मोहिमांमुळेच अल्पावधीतच महाराष्ट्र गिर्यारोहण क्षेत्रात डॉ.भिसे यांचे नाव झाले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्रा.भिसे यांचे चिरंजीव असलेले डॉ.समीर भिसे हे शालेय जीवनात एक उत्कृष्ट धावपटू होते आणि खो खो खेळात अग्रेसर होते. या गोष्टीचा त्यांना गिर्यारोहण क्षेत्रात नक्कीच फायदा झाला. या पुढेही हिंदवी स्वराज्यातील/मराठा साम्राज्यातील शिवरायांचे रूप असणारे दुर्ग व घाटवाटा भटकंती आणि सुळके आरोहण हे सुरक्षितपणे करत रहाणार असे डॉ.समीर भिसे यांनी सांगितले.