सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे आज गुरुवार दि.२४ आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.मात्र महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटत नसल्याने विधानसभेसाठी चार जणांपैकी महायुतीचा उमेदवार कोण याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
महायुतीतील उमेदवारांची आठ दिवसांपासून मुंबई वारी सुरू असली तरी महायुतीच्या वरिष्ठांकडून मार्ग निघत नसल्याने भोर विधानसभेसाठी उमेदवार ठरला जात नसल्याचे चित्र आहे.चार ते पाच दिवसांपासून महायुतीतील या पक्षाच्या उमेदवाराचे सकाळी एक नाव घोषित होत आहे.तर संध्याकाळी दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराचे नाव हिटलिस्टवर येत असल्याने भोर,राजगड,मुळशी तालुक्यात चर्चां रंगू लागल्या आहेत.महायुतीतील उमेदवाराचे नाव घोषित झाल्याच्या अफवांवर-अफवा उठवल्या जात आहेत. महायुतीत भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या पक्षश्रेष्ठींनी कोणत्याही पक्षाचा उमेदवार भोर विधानसभेसाठी जाहीर केला तरी त्या उमेदवाराचे वज्रमुठ करून एकसंघ राहून मदत करणार असल्याचे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.मात्र जनतेत संभ्रम निर्माण झाला असून माझ्याच पक्षाच्या नेत्याला उमेदवारी मिळणार आहे, माझ्या नेत्याला जा तयारीला लागा अशी सांगितले आहे.तर आमचा नेता सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून भोर विधानसभेत झगडत असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल असे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ठोसपणे बोलले जात आहे.मात्र महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यातील चार जणांनी मुंबई येथे मुक्काम ठोकून आमदारकीची तिकीट मिळवण्यासाठी आपली ताकद पक्षश्रेष्ठींजवळ पणाला लावली असल्याचे समोर येत आहे.यात कोणाला श्रेय मिळणार आणि भोर विधानसभेची धुरा कोणाकडे जाणार याकडे जनता डोळे लावून बसली आहे.