सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पंधरा दिवसांवर येऊ घातलेल्या भोर विधानसभा आखाड्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावाच्या पारांवर चांगल्याच राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. आमचाच नेता विजय होणार...गुलाल तर आम्हीच घेणार...नाही रे तुमच्या दोघांचे राहू द्या.. माझ्याच पक्षाचा आमदार होणार अशा गप्पांना उधाण आले असून या गप्पांमुळे एकमेकांमध्ये रोष वाढत आहेत.
भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शंकर मांडेकर तर महायुतीतून भाजपा किरण दगडे पाटील, शिवसेना शिंदे गट कुलदीप कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रणजीत शिवतरे व विक्रम खुटवड इच्छुक असल्याच्या ग्रामीण भागातील पारांवरच्या चर्चांना चांगलीच रंगत आली आहे.या चर्चेत एकीकडे माझ्याच पक्षाचा नेता श्रेष्ठ आहे, त्याने कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली तर दुसरीकडे अरे बाबा आमचा नेता तर सर्वसामान्य जनतेच्या मनातील निष्ठावंत नेता आहे, तालुक्याच्या विकासात त्याचे श्रेय मोठे आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीत तोच निवडून येणार, लावतो का पैज असे म्हणत पैजा लावल्या जात आहेत. बुजुर्ग व्यक्ती मोकळीक मिळताच तासनतास तहानभूक विसरून पारांवरच्या गप्पामध्ये रंगून जात आहेत.मात्र कोणीही कितीही कात्या कुटला तरी विधानसभेला महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची समोरासमोर लढत होणार असल्याचे तरुणांकडून बोलले जात आहे.
COMMENTS