सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
मलकापूर, ता. कराड गावच्या हद्दीत दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणाऱ्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे. या कारवाईत दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. आसिफ सलीम शेख राहणार शिंदे गल्ली कराड, सुलताना शकील सय्यद राहणार मंगळवार पेठ करडी पिराजवळ कराड, अजमेर उर्फ अज्जू मोहम्मद मांगलेकर वय 36 राहणार गोळेश्वर कार्वे नाका कराड, नजर मोहम्मद मुल्ला वय 33 राहणार 262 रविवार पेठ कराड, ऋतुराज धनाजी खंडक वय 29 राहणार तांबे तालुका कराड, ऋषिकेश धनाजी खंडक वय 26 राहणार तांबवे तालुका कराड, करीम अजित शेख वय 35 राहणार 192 मंगळवार पेठ कराड, अक्षय अशोक शिंदे वय 29 राहणार तामजाई गल्ली तांबवे तालुका कराड, नजीर बालेखान मुल्ला वय 33 राहणार राजीव नगर सैदापूर कराड, शैलेश शिवाजी घाडगे वय 24 राहणार निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा, अविनाश संजय घाडगे वय 29 राहणार निमसोड तालुका खटाव अशी आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपये, याशिवाय स्विफ्ट इनोव्हा सियाज ही चारचाकी वाहने, याशिवाय दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधितांना 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्याकडून साधारण 11 लाख रुपयांची रक्कम हस्तगत होणे बाकी आहे. ही रक्कम हवाला प्रकरणाची असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले असून यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग, आयकर विभाग, जीएसटी डिपार्टमेंट याशिवाय सक्तवसुली संचालनालयाला सुद्धा या प्रकरणाची खबर देण्यात आली आहे. या पैशाची खातरजमा सर्व पातळीवर करण्यात येणार असून या मागील सत्य तातडीने समोर आणणार असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.