सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
जलसंपदा विभागाकडून फलटण तालुक्यामध्ये तडवळे बंगला ते रावडी या चार किमीचे सिमेंट काँक्रीट मध्ये अस्तरीकरणाचे काम पुन्हा एकदा सुरू केले आहे पंधरा महिन्यांपूर्वीही या ठिकाणी अस्तरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र त्यावेळी फलटण तालुक्यातील २१ गावांनी या अस्तरीकरणाला विरोध करून फलटण प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला होता यानंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते मात्र मागील तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी पुन्हा एकदा अजस्त्र मशिनरी दाखल झाल्या असून अस्तरीकरणाचे काम ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रशासनाने चालू केले आहे
अस्तरीकरणामुळे कालव्या लगत असणाऱ्या विहिरी व कुपनलिका, बोअरवेल बंद पडण्याच्या भीतीने या कामाला तालुक्यातील तडवळे, सुरवडी, मुरूम, रावडी बुद्रुक, रावडी खुर्द, खामगाव, होळ, डोंबाळवाडी, कुसुर,पाडेगाव, खराडेवाडी, निंभोरे, वडजल, भिलकटी , चौधरवाडी,साखरवाडी, सासवड, पाडेगाव,निंभोरे,तरडगाव,काळज,घाडगेमळा या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करून विरोध केला होता तसेच हजारोंच्या संख्येने फलटण येथील प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा दाखल केला होता या नंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते मात्र आता प्रशासनाने पुन्हा एकदा अस्तरीकरणाचे काम सुरू केलं असल्याने याविरोधी प्रशासनाला निवेदन देऊन प्रसंगी आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर २१ गावातील ग्रामस्थ बहिष्कार घालणार असल्याचा इशारा कालवा बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दि २१ रोजी निवेदनाद्वारे प्रशासनाला देणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच काम घेतलेल्या अशोका डेव्हलपर्स या कंपनीला सुद्धा काम न करण्याबाबत निवेदन कालवा बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे
बारामती तालुक्यातुन वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याच्या भरावाला सुद्धा अस्तरीकरण करण्याचे काम सुरू होते मात्र बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केला परिणामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात अस्तकरिकरणाचे काम भविष्यात करणार नसल्याचे जाहीर सभेत जाहीर करून काम बंद केले होते त्याप्रमाणे फलटण तालुक्यातील राजकीय पक्ष हे काम थांबवणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
ज्या गावांचा या अस्तरीकरणाला विरोध नाही त्या गावांच्या हद्दीत व फलटण शहरातून वाहणाऱ्या कालव्याला अस्तरीकरण करण्याला कालवा बचाव संघर्ष समितीचा विरोध नसल्याचे संघर्ष समितीच्या सदस्यांनी सांगितले