सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाडेगाव : प्रशांत ढावरे
सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून तो पूर्णक्षमतेने चालविण्यासाठी ऊसाची कमतरता भासत होती. इतर जिल्ह्यातून गेटकेन ऊस आणावा लागत होता. परंतु, पाडेगाव संशोधन केंद्राने सन २००७ मध्ये प्रसारित केलेल्या फुले २६५ वाणामुळे सोमेश्वर कारखाना उसाबाबत स्वयंपूर्ण झाला असून ही संस्था कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असल्याचा अभिमान असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे
विक्रीचा शुभारंभ पुरूषोत्तम जगताप, को ८६०३२ या वाणाचे जनक व डॉ. आर वाय. जाधव, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते प्रफुल्ल जाधव, कार्तिक अडसूळ, गणपत वायाळ, रमेश काटे, राजाराम भोसले, संदीप गायकवाड या प्रगतशील शेतकऱ्यांना फुले २६५ या ऊस वाणाच्या मुलभूत बेणे मळयातील पहिली मोळी देवून बियाणे विक्री व वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ऊस संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. सुरज नलावडे, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. कैलास काळे, डॉ. कैलास भोईटे, सोमेश्वरचे मुख्य शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर, डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. माधवी शेळके, राजेंद्र पांढरे, संतोष शिंदे, दिनेश पाटील, भाऊसाहेब बेल्हेकर उपस्थित होते.
पुरुषोत्तम जगताप पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी तीन वर्षातून एकदा बियाणे बदल्यास उत्पादनाबरोबरच साखर उतारा वाढेल. बदलत्या हवामानानूसार प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किमान ४ ते ५ वाणांची लागवड करणे. सन २००९-१० मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व निरा नदी काठच्या चोपन जमिनीमध्ये फुले २६५ या वाणाची अधिक उत्पादन व साखर देणाऱ्या वाणाची लागवड झाल्याने कारखाना ऊस पुरवठयाबाबत स्वयंपूर्ण झाला आहे. सभासद, शेतकरी यांनी शेतीत लक्ष दिल्याने अधिक उत्पादन घेत आर्थिक प्रगती साधली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे सहकार्य लाभले. साखर उतारा वाढवण्यासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची मदत झाली. जास्तीत जास्त साखर उतारा मिळविण्यासाठी को ८६०३२ या
वाणाला प्राधान्य देत फुले २६५ चे गाळप केले आहे.
..............
पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या फुले २६५, को ८६०३२, फुले १०००१, फुले ९०५७ व मागील ३ वर्षात प्रसारीत केलेले नवीन वाण फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ आणि फुले ऊस १५००६ या
पाण्याचा ताण सहन करणारे आणि चोपण जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाण सोमेश्वरच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी नवीन वाणांची जास्तीत जास्त लागवड करून उत्पादनात वाढ करावी. संशोधन केंद्राने विकसित केलेले आधुनिक ऊस लागवड व खोडवा ऊस व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
पुरुषोत्तम जगताप : अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
COMMENTS