सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
गेली एक महिना सुरू असलेली प्रचार रणधुमाळे आता थांबली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती तालुक्यातील आमदार कोण ? हा संपूर्ण देशाला पडलेला एक प्रश्न आहे. याबाबत अनेक राजकीय पक्ष तर्क वितर्क लावीत असले तरी ? जनतेचा कौल कोणाला हे सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. नुकतच झालेल्या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झालं हा एक विचाराचा भाग आहे.
बारामतीच्या पश्चिम भागात आजही अनेक गावातील मोठ्या प्रमाणात क्षेत्र जिरायती आहे. येथील शेतकऱ्यांना कायम हक्काच पाणी मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्ष राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र अद्याप तरी कुठलेही सरकारने याबाबत ठोस निर्णय घेऊन प्रश्न सुटलेला नाही. ऐतिहासिक परगाना अशी ओळख असलेल्या सुपा आणि परिसरातील अनेक गावात पाणी आले पण ? नियोजन आणि भ्रष्टाचार हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावातील राजकीय प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या सर्वच पुढाऱ्यांवर सर्वसामान्य जनता नाराज आहे. आमदार आणि मतदार यांच्यात आजवर सुसंवाद कमी पडलेला हे राजकीय पुढारी जबाबदार असल्याची चल जनतेच्या मनात आहे. अनेकांची कामे वेगवेगळ्या कारणाने अडवणूक करणे अथवा योग्य रीतीने झाले नसल्याने मतदारांच्या तिरस्काराची भावना होती.
जिरायती भागात बहुतेक गावातील अनेक तरुण मुले रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत शेतीला पाणी नाही अनुभव नसल्याने व्यवसाय नाही. राजकीय वरदस्त नसल्यामुळे नोकरी नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सध्या तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांची होणारी गैरसोय तसेच अधिकारी वर्गाकडून होणारे आर्थिक शोषण या गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.
तालुक्याचे प्रत्येक गावात चौका चौकात भावी आमदार व राजकीय समीकरणे जुळवली जात असले तरी मतदारांनी नेमकी कोणाला पसंती दिली हा प्रश्न खऱ्या अर्थाने अनुत्तरीत आहे. येणारा आमदार कोणीही असो परंतु यापुढे जबाबदारीनं काम केलं तरच बरं….. अन्यथा मतदार योग्य निर्णय घेतील हेच खरं...