सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आज दुपारपासून दिसू लागला आहे. ताशी ९० किलोमीटर इतका प्रचंड वेग या चक्रीवादळाचा आहे. हे चक्रीवादळ आता प्रचंड वेगानं तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागाकडे सरकत आहे.
शनिवारी दुपारपासून हवामानात बदल झाला आहे. चक्रीवादळ हे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेशातही पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. फेंगल चक्रीवादळामुळे आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. आज संध्याकाळीपर्यंत ते पुद्दुचेरी आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणार आहे. ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ हे ताशी ७०-८० किलोमीटर वेगाने पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरम येथे सरकत आहे. बंगालच्या उपसागरावरील दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. आयएमडीने आंध्र प्रदेशातच्या किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ही दिला आहे.
चक्रीवादळामुळे या भागात ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात असा ही इशारा देण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभाव आता वाढू लागला आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. फेंगल चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने सुमारे १२ लाख रहिवाशांना एसएमएसद्वारे अलर्ट पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे.