सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाठार स्टेशन : प्रतिनिधी
सातारा -लोणंद राष्ट्रीय महामार्गावर सालपे ता.फलटण गावच्या हद्दीत सालपे घाटात भरधाव वेगात आलेल्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. तनुजा नितेंद्र अनपट वय ३१, रा.अनपटवाडी ता कोरेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि,२४ रोजी तनुजा या त्यांचा पुणे येथे कंपनीत कामाला असणारा भाऊ महेश भुजंगराव शिंदे (वय २५, रा. चौधरवाडी) यांच्यासोबत दुचाकीवरुन (क्र.एम एच ११ डी पी ६८८१) गावाहून पुण्याला असणाऱ्या बहिणीकडे निघाल्या होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास ते सालपे घाटात पोचल्यावर सातारा बाजूकडून लोणंद बाजूकडे भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने (क्र.एन एल ०९ ए डी ९१४६) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तनुजा जागीच ठार झाल्या. तर भाऊ महेश याच्या डोक्याला हेल्मेट असल्याने त्याच्या हातापायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारा करता तातडीने लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. सदर घटनेची फिर्याद रितेश सर्जेराव अनपट यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.