सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिरस : विजय पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या दि. ८ रोजी मारकडवाडी येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार हे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे येणार आहेत. ईव्हीएम विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते.
याच ठिकाणी आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत. सोलापूर जिह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर विजयी झाले. मात्र, मारकडवाडीत जानकर यांना अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमविरोधात उठाव करीत 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पूर्ण तयारी केली; परंतु सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करीत गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आणि मतदान प्रक्रिया रोखली.